New delhi : गाडी थांबवायला सांगितल्यावरही थांबवली नाही, त्यामुळे दुर्घटना, नागालँड गोळीबारावर शहांचं उत्तर
जवानांनी गाडी थांबवायला सांगितल्यावरही गाडी थांबली नाही, त्यामुळे जवानांचा समज चुकीचा झाला. चुकीची ओळख झाली आणि त्यातून ही घटना घडली असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे.
नवी दिल्ली : नागालँडमध्ये जवानांनी केलेल्या गोळीबारात 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावर दिल्लीत संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन देत स्पष्टीकरण दिलं आहे. चुकीची ओळख निघाल्यानं ही गोळीबाराची घटना घडली होती. घटनेनंतर उसळलेल्या दंगलीत एका जवानाचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर नागालँडमध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं, या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती अमित शाह यांनी त्यांच्या निवेदनातून दिली आहे.
गाडी थांबवायला सांगितल्यावरही थांबवली नाही
जवानांनी गाडी थांबवायला सांगितल्यावरही गाडी थांबली नाही, त्यामुळे जवानांचा समज चुकीचा झाला. चुकीची ओळख झाली आणि त्यातून ही घटना घडली असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं आहे. जवानांनी दहशतवादी समजून गोळीबार केला. त्यात सहा मजुरांसह एकूण 14 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नागालँडमध्ये दंगल उसळली होती. त्या दंगलीत एका जवानाचाही मृत्यू झाला.
नागालँडमध्ये सैन्याचा बंदोबस्त वाढवला
यानंतर लष्कराकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात त्यांनी नागरिकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. तसेच सर्व सुरक्षा दलांना अशी घटना भविष्यात होऊ नयेत अशा सूचनाही दिल्या आहेत. तसेच भारत सरकारनेही या घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे.
ओळख पटल्यानंतर सैन्यानेच नागरिकांना रुग्णालयात नेले
हे सर्वसामान्य नागरिक आहेत, हे सैन्याच्या लक्षात आल्यानंतर सैन्यानेच नागरिकांना रुग्णालयात नेले अशीही माहिती अमित शाह यांनी दिली आहे. संतप्त नागरिकांकडून सैन्याच्या कॅम्पवरही हल्ला करण्यात आला होता. आता नागालँडमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार पाऊले उचलत आहे.