Crime | आधी अॅनेस्थेशिया देऊन बेशु्द्ध केलं, मग हत्या करुन जाळलं; एका मटण सूपने सारं उलगडलं, वाचा सविस्तर
स्वाती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करीत होती त्याच हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या राजेशसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे त्यांना सुधाकरची आपल्या संबंधात अडचण वाटू लागली. म्हणूनच या दोघांनी सुधाकरचा काटा काढायचे ठरवले.
तामिळनाडू : सिनेमात शोभेल अशी एक घटना तामिळनाडूतील नागरकॉइल येथे उघडकीस आली आहे. एका मटण सूपने एका हत्येचा उलगडा केला असून या घटनेमुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे. अनैतिक संबंधातून एक महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. एम. स्वाती असं महिलेचं नाव असून राजेश असं तिच्या प्रियकराचं नाव आहे. स्वाती आणि राजेश यांच्यात प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून या दोघांनी स्वातीचा पती सुधाकरचा काटा काढला.
दोघांत तिसरा आला अन्…
स्वाती हिचा सुधाकर रेड्डी यांच्याशी विवाह झाला होता. या दोघांना दोन मुलंही आहेत. स्वाती ही पेशाने नर्स आहे. नागरकॉइल येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये स्वाती नर्स म्हणून काम करीत होती. कुटुंबाचं सर्व काही ठीक चाललं होतं. मात्र दोघात तिसरा आला आणि होत्यात नव्हतं झालं. स्वाती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करीत होती त्याच हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या राजेशसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे त्यांना सुधाकरची आपल्या संबंधात अडचण वाटू लागली. म्हणूनच या दोघांनी सुधाकरचा काटा काढायचे ठरवले.
तामिळ सिनेमातून प्रेरणा घेऊन प्लान केला
एका तामिळ सिनेमाची प्रेरणा घेऊन स्वाती आणि राजेश यांनी सर्व प्लान आखला. प्लानप्रमाणे सुधाकरला आधी अॅनेस्थेशिया देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याच्या डोक्यात वार करुन त्याला ठार मारण्यात आले. मारल्यानंतर सुधाकरचा मृतदेह जंगलात नेऊन जाळण्यात आला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे राजेशच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकून त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला. जेणेकरुन त्याचा चेहरा ओळखता येऊ नये. यानंतर या दोघांनी अज्ञातांनी अॅसिड हल्ला केल्याचा बनाव करीत सुधाकर बनून राजेशला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
मटण सूपमुळे बिंग फुटलं
सुधाकरवर हल्ला झाल्याचे कळताच त्याचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी भाजलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये सूप दिले जात होते. जेव्हा सुधाकर उर्फ राजेशला सूप देण्यात आले तेव्हा त्याने ते नाकारले आणि आपण शाकाहारी असल्याचे सांगितले. यामुळे सुधाकरच्या कुटुंबियांना संशय आला. कारण सुधाकर मांसाहारी होता. तसेच सुधाकर असल्याचा बनाव करताना राजेशचे काही वागणं सुधाकरच्या घरच्यांना संशयास्पद वाटलं. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास करीत या प्रेमी युगुलाचा पर्दाफाश केला. त्यानंतर या दोघांनी आपला गुन्हा कबूल करीत सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. (In Tamil Nadu, wife kills husband over extramarital affair)
इतर बातम्या