IINDIA ALLIANCE | मोठी बातमी! इंडिया आघाडीची सर्वात पहिली जाहीर सभा तडकाफडकी रद्द
इंडिया आघाडीची ऑक्टोबर महिन्यात सर्वात पहिली मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली. पण सभा अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही सभा नेमकं कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली? याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय.
भोपाळ | 16 सप्टेंबर 2023 : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची नवी दिल्लीत नुकतीच बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर समन्वय समितीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. इंडिया आघाडीत आता जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. तसेच लवकरच इंडिया आघाडीच्या देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित सभा पार पडणार, असं वेणुगोपाल यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशच्या भोपाळ या शहरात आयोजित करण्यात आलीय. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होईल, अशी माहिती के सी वेणुगोपाल यांनी दिली होती. पण वेणुगोपाल यांनी इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कमलनाथ यांच्याकडून स्पष्टीकरण
विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. इंडिया आघाडीची भोपाळमधील सभा रद्द झालीय, असं त्यांनी सांगितलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने केंद्रीय नेतृत्वासमोर सभा आयोजित करण्यात असमर्थता दर्शवल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशचे निवडणूक प्रभारी रणजित सुरजेवाला यांना प्रश्न विचारण्यात आला असता, याबाबत आमची बातचित सुरु आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत बैठक होईल. त्यानंतर सभेबद्दल निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता कमलनाथ यांनी सभा रद्द झाल्याची माहिती दिली आहे.
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इंडिया आघाडीवर निशाणा
दुसरीकडे इंडिया आघाडीची भोपाळमधील सभा रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर टीका केलीय. “मध्य प्रदेशच्या नागरिकांमध्ये काँग्रेसविरोधात रोष आहे. हा रोष सभेत प्रकट होणार तर नाही ना, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने सभा रद्द केली आहे. जनतेचा आक्रोश हा इंडिया आघाडीच्या विरोधात आहे”, अशी टीका शिवराज सिंह यांनी केली.