ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं दीर्घ आजारानंतर निधन
या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना कोविड-19 ची लागण झाली होती आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
नवी दिल्लीः ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ (veteran jounrlist Vinod Dua)(67) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना दिल्लीतील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना कोविड-19 ची लागण झाली होती आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
भारतातील टीव्ही पत्रकारितेतील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, विनोद दुआ यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीचा दीर्घकाळ दूरदर्शन आणि NDTV सोबत काम केले. त्यानंतर त्यांनी ऑनलाइन न्यूज पोर्टलसाठी काम केले. ते नेहमीच त्यांच्या ठाम भूमिका आणि दृष्टिकोनासाठी ओळखले जात होते आणि भारतातील अनेक पत्रकारांसाठी ते आदर्श होते. त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारही प्रदान केला होता.
त्यांची मुलगी अभिनेता-कॉमेडियन मल्लिका दुआ हिने सोशल मीडियावर विनोद दुआ यांच्या निधनाची माहिती दिली.
विनोद दुआ आणि त्यांची पत्नी पद्मावती (चिन्ना) दुआ यांना दुसऱ्या लाटेदरम्यान कोविडची लागण झाली होती. दोघांनाही गुरुग्रामच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. या आजाराशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर जूनमध्ये चिन्ना दुआचा कोविड-19 मध्ये मृत्यू झाला. विनोद दुआ हे कोविड-19 मधून बरे झाले होते. मात्र नंतर त्यांना तब्येतीची समस्या निर्माण झाली. तेव्हापासून त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले. विनोद दुआ यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मल्लिकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
विनोद दुआ यांच्या पश्चात दोन मुली आहेत, बकुल दुआ, एक मानसशास्त्रज्ञ आणि मल्लिका दुआ.
इतर बातम्या