खरगे यांच्या मुलाची मंत्रीपदी वर्णी?; सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळात किती दलित? किती मुस्लिम मंत्री?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आठ आमदार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. शपथविधी सोहळ्याला सर्वांना निमंत्रण आहे. प्रत्येकजण या सोहळ्यात येत आहे.
बंगळुरू : कर्नाटकात घसघशीत यश मिळाल्यानंतर आज काँग्रेस आज सरकार स्थापन करणार आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धारमैया हे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. साधारण 8 आमदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिद्धारमैया यांना आपल्या मंत्रिमंडळात सोशल इंजीनिअरिंगवर अधिक भर दिला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धारमैया यांनी ही जुळवाजुळव केल्याचं सांगितलं जात आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी 8 नावांना मंजुरी दिली आहे. हे आठही जण आज पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. समुदाय, क्षेत्र, गटांचे प्रतिनिधी, ज्येष्ठता आणि नवीन पिढी असं समीकरण साधत नवं मंत्रिमंडळ तयार केलं गेलं आहे. सिद्धारमैया हे कुरुबा समाजातून येतात. तर डीके शिवकुमार हे वोक्कालिंगा समुदायातून येतात. सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळात लिंगायत, ख्रिश्चन, आदिवासी, मुस्लिम, रेड्डी, दलित आणि मुस्लिम आदींना प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
संभाव्य मंत्री
जी परमेश्वर (एससी), केएच मुनियप्पा (एससी), प्रियांक खरगे (एससी), केजे जॉर्ज (अल्पसंख्याक-ख्रिश्चन), एमबी पाटील (लिंगायत), सतीश जारकीहोली (एसटी-वाल्मिकी), रामलिंगा रेड्डी (रेड्डी) आणि मुस्लिम समुदायातून बीजेड ज़मीर अहमद खान मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.या मंत्रिमंडळात मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांनाही संधी मिळाली आहे. स्वत: मल्लिकार्जुन खरगे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधीही शपथविधीसाठी पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेकडून अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.
केजरीवाल, चंद्रशेखर नाहीत
या शिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कर्नाटकाचा विकास होईल
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आठ आमदार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. शपथविधी सोहळ्याला सर्वांना निमंत्रण आहे. प्रत्येकजण या सोहळ्यात येत आहे, असं सांगतानाच राज्यात काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे कर्नाटकात विकासकामे होतील. कर्नाटकाचा फायदा होईल. देशात चांगलं वातावरण तयार होईल, असं खरगे यांनी सांगितलं.