4 वर्षापूर्वी मेलेल्या मुलाचा आत्मा घ्यायला 24 लोक रुग्णालयात आले, नंतर काय घडलं? विचित्र दाव्याने डोकं सुन्न
कोटा येथील एमबीएस रुग्णालयात एका चार वर्षांपूर्वी निघालेल्या मुलाच्या आत्म्यासाठी त्याचे कुटुंबीय आले होते. 24 जणांच्या जत्थ्याने रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. या घटनेमुळे रुग्णालयात वाद निर्माण झाला आणि तिघांना अटक करण्यात आली.
राजस्थानच्या कोटा शहरातील अंधश्रद्धेचा भयंकर प्रकार समोर आला आहे. लोक किती अंधश्रद्धाळू असू शकतात त्याचंच हे उदाहरण आहे. इथल्या एमबीएस रुग्णालयात चार वर्षापूर्वी उपचार सुरू असताना एका मुलाचा मृत्यू झाला होता. आज सकाळी त्याच्या कुटुंबातील लोक त्याचा आत्मा घेऊन जाण्यासाठी रुग्णालयात आले होते. बुंदी येथून तब्बल 24 लोक आले होते. मात्र, रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत सोडलं नाही. पण या विचित्र प्रकाराने सर्वांचंच डोकं सुन्न झालं आहे. या लोकांना म्हणावं तरी काय? असा सवाल प्रत्येकाला पडला आहे.
मृत मुलाचं नाव मनराज आहे. तो बूंदी जिल्ह्यातील डापटा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील झाडगंजचा रहिवाशी आहे. चार वर्षापूर्वी त्याला एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. आता चार वर्षानंतर त्याचे कुटुंबीय आज सकाळी 8 वाजता रुग्णालयात आले. त्यांच्या सोबत 24 लोक होते. त्यात महिलांची संख्या अधिक होती. एवढा मोठा जत्था एकत्र आल्याचं पाहून रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी आम्ही मुलाचा आत्मा घेऊन जायला आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हुसकावून लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे या लोकांनी रुग्णालयात जाऊ देत नाही म्हणून रुग्णालयाच्या बाहेर प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांना शिव्याशाप दिले. त्यामुळे पोलिसांनी अखेर यातील तिघांना अटक केली असून त्यांची थेट तुरुंगात रवानगी केली आहे.
गेटवरच गोंधळ
एमबीएस रुग्णालयाच्या गेटवर पूजा केल्यानंतर एक महिला विचित्रपणे वागायला लागली. तिच्या अंगात आल्याने ती गेटवरच घुमायला लागली. तिच्या अंगात देवी-देवता आल्याचं या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलं. आमच्या मुलाचा आत्मा याच रुग्णालयात आहे. आम्हाला तंत्र साधना करून त्याचा आत्मा सोबत न्यायचा आहे, असं सांगत या लोकांनी रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना हुसकावून लावल्याने त्यांनी अधिकच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी गेटवर जोरदार गोंधळ केल्याने पोलिसांना त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी लागली.
यापूर्वी असे प्रकार घडले
या रुग्णालयात हा पहिल्यांदाच घडलेला प्रकार नाही. नेहमी अशा घटना या ठिकाणी होत असतात. दोन वर्षापूर्वी काही लोक मृत मुलीचा आत्मा आणायला आले होते. या मुलीचा जन्म याच रुग्णालयात झाला होता. पण आजारपणामुळे तिचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या मुलीला हॉस्पिटलच्या बाहेरच दफन करण्यात आलं होतं. मात्र, 15 वर्षानंतर या मुलीचे कुटुंबीय रुग्णालयात आले होते. आमच्या मुलीचा आत्मा घेऊन जायचा आहे, असं ते सांगत होते.
दोन वर्षापूर्वीही एक असंच प्रकरण घडलं होतं. एका कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाला होता. त्याचे कुटुंबीयही त्याचा आत्मा घेण्यासाठी एमबीएस रुग्णालयात आले होते. कुटुंबाने रुग्णालय परिसरात विशेष पूजा केली होती. आणि आमच्या मुलाचा आत्मा घेऊन जात असल्याचा दावाही केला होता. त्यांच्या मुलाचा मृत्यूही चार वर्षापूर्वीच झाला होता.