‘डॅशिंग लेडी सिंघम’, ‘दबंग कॉप’चं अपघाती निधन; होणाऱ्या नवऱ्यालाही केली होती अटक
लेडी सिंघम आणि दबंग कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक जुनोमनी राभा यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या कारची कंटेनर ट्रकला धडक बसली. या अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिसपूर : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आपल्या होणाऱ्या नवऱ्यालाही अटक करणाऱ्या आणि वादग्रस्त कारकिर्द ठरलेल्या लेडी सिंघमचा अपघाती मृत्यू झाला आहे. जुनोमनी राभा असं या लेडी सिंघमचं नाव आहे. त्या आसाम पोलीस दलात उप निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. नागाव जिल्ह्यातील कलियाबोर येथील सरूभुगिया गावात या लेडी सिंघमची कार एका कंटेनर ट्रकला धडकली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. जुनोमनी या आपल्या खासगी कारमधून प्रवास करत होत्या. त्यांनी वर्दी परिधान केलेली नव्हती.
जुनोमनी राभा यांना लेडी सिंघम आणि दबंग कॉप म्हणूनही संबोधलं जायचं. त्या मोरीकोलोंग पोलीस ठाण्याच्या प्रभारी होत्या. गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. सोमवारी रात्री 2.30 वाजेच्या सुमारास त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच गस्ती पथक घटनास्थळी पोहोचलं. जखमी अवस्थेत असलेल्या जुनोमनी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, अशी माहिती जाखलाबांधा पोलीस ठाण्याच्या प्रभारी पवन कालिता यांनी दिली.
ट्रक जप्त, चालक फरार
उत्तर प्रदेशातून येत असलेल्या या कंटनेर ट्रकला पोलिसांनी जप्त केलं आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. नागांव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधीक्षक लीना डोले यांनी सकाळी घटनास्थळी जाऊन संपूर्ण माहिती घेतली. दरम्यान, जुनोमनी राभा या खासगी कारने जात होत्या आणि त्यांच्या अंगावर वर्दी होती की नव्हती, तसेच त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक होते की नव्हते याची कोणतीच माहिती मिळालेली नाही. तसेच त्या आसामच्या कोणत्या भागात का आणि कशासाठी जात होत्या याचीही माहिती मिळालेली नाही. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही त्या कुठे जात होत्या याची खबर नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
वादग्रस्त कारकिर्द
जुनोमनी राभा यांची कारकिर्द तशी वादग्रस्तच राहिली. त्यांनी त्यांचा आधीचा प्रियकर आणि होणाऱ्या नवऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर जुनोमनी यांनाही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. दोन दिवसाच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता कोर्टाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांना सेवेतूनही निलंबित करण्यात आलं होतं.
नंतर त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलं होतं. त्यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं होतं. गेल्या वर्षी जानेवारीत बिहपुरीया येथील भाजपचे आमदार आमिय कुमार भुइंया यांच्याशी झालेला त्यांचा संवादही लिक झाला होता. त्यामुळे त्या अडचणीत सापडल्या होत्या.