Mamata Banerjee to PM Modi: आधी आमची देणी क्लिअर करा, एक काय 5 वर्ष पेट्रोल-डिझेलवर कर लावणार नाही; ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर
Mamata Banerjee to PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेतली होती.
नवी दिल्ली: गैर भाजपशासित राज्यांनी इंधनावरील कर कमी करावा. नागरिकांना दिलासा द्यावा, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सुनावले होते. त्यानंतर गैरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीकेची जोरदार झोड उठवली. या मुद्द्यावरून संबंध देशात राजकारण तापलं आहे. आमच्या सरकारने गेल्या तीन वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी 1500 कोटीहून अधिक रक्कम खर्च केली आहे, असं सांगतानाच तुम्ही आमच्या सर्व देणी क्लिअर करा. आम्ही पाच वर्ष पेट्रोल आणि डिझेलवर कर लावणार नाही, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या पलटवार नंतर आता केंद्र सरकार काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. देशाच्या विकासात महाराष्ट्राचं सर्वाधिक योगदान आहे. पण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जातेय, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केला होता. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनीही केंद्रावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेतली होती. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतली होती. पण या बैठकीत मोदींना इंधन दरवाढीचा मुद्दा काढून गैर भाजप शासित राज्यांना इंधन दरवाढीला जबाबदार धरले. महाराष्ट्र, केरळ आणि पश्चिम बंगाल सारख्या गैरभाजपशासित राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावा. त्यामुळे नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळेल असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.
आम्ही तीन वर्षांपासून सबसिडी देतोय
त्यावर ममता बॅनर्जी यांनी पलटवार केला आहे. मोदींचं विधान दिशाभूल करणारं आहे. मोदींनी शेअर केलेली वस्तुस्थिती चुकीची आहे. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलवर सबसिडी देत आहोत. त्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षात 1500 कोटी रुपये खर्च केले आहेत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
आधी आमचे 97,000 कोटी द्या
केंद्र सरकार आम्हाला पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करायला सांगितला आहे. केंद्राकडे 97,000 कोटी रुपये थकलेले आहेत. यातील अर्धे पैसे जरी केंद्राने आम्हाला दिले तर आम्ही कर कमी करू. केंद्र सरकारने आम्हाला आमचे थकलेले पैसे द्यावेत, ते येताच आम्ही पेट्रोल आणि डिझेलवर 3000 कोटी रुपयांची सबसिडी देऊ. आम्हाला सबसिडी देण्यात काहीच अडचण नाहीये. पण आमची देणीच दिली नाही तर आम्ही सरकार कसे चालवायचे? असा सवालच ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
मोदी सरकारने 17,31,242 कोटी कमावले
काल कोरोनाची बैठक होती. त्यावेळी मोदींनी इंधनाचा विषय काढला. या बैठकीत आम्हाला बोलण्याची संधीच नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देऊ शकलो नाही, असं त्यांनी सांगितलं. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून 2014पासून ते आतापर्यंत 17,31,242 कोटींची कमाई केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मोदी सरकारने एवढी कमाई केल्यानंतरही राज्यांना कर कमी करण्यासाठी सांगत आहे. याची माहिती तुम्ही लोकांना का देत नाही? पेट्रोल- डिझेलवरील कर तुम्ही का कमी केला नाही? असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.
पंतप्रधान काय करतात ते पाहत आहोत
टीएमसीनेही ट्विट केलं आहे. केंद्र सरकारने आमची थकलेली रक्कम दिली तर आम्ही पाच वर्षापर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर कर लावणार नाही. केंद्राकडे आमचे 97,807.91 कोटी रुपये थकले आहेत. पंतप्रधान मोदी यावर काय करतात ते आम्ही पाहू, असं ट्विट टीएमसीने केलं आहे.
Mr. @narendramodi, we would like to draw your kind attention to key numbers that you may have missed in today’s ‘gyaan baato’ session ?
Government of India owes Government of West Bengal a WHOPPING ₹ 97807.91 Cr!
Care to shed light on this? Any plans to clear our dues?
— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 27, 2022