Rohit Pawar: आधी बुद्धाच्या सारनाथमधून शाहू महाराजांना अभिवादन, आता रोहित पवार उद्या अयोध्येला जाणार
Rohit Pawar: रोहित पवार यांनी स्वत: ट्विटरवरून आपल्या या तिर्थयात्रेची माहिती दिली आहे.
सारनाथ: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit Pawar) सध्या चार दिवसासाठी तिर्थयात्रेवर गेले आहेत. रोहित पवार सहकुटुंब उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) दौऱ्यावर आले आहेत. उत्तर प्रदेशातील सारनाथला त्यांनी आज भेट दिली. ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचं (buddha) वास्तव्य होतं त्या सारनाथमध्ये आज रोहित पवार होते. आज लोकराजा शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी आहे. त्यामुळे सारनाथच्या स्तुपांजवळ उभं राहून रोहित पवार यांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं. या चार दिवसात रोहित पवार उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांना भेट देणार आहेत. त्यानंतर ते उद्या दुपारी 12 वाजता अयोध्येला जाणार आहेत. विशेष म्हणजे एकीकडे राज्यातील मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अयोध्या दौऱ्याच्या घोषणा केल्या आहेत. तर दुसरीकडे कोणतीही घोषणा किंवा गाजावाजा न करता रोहित पवार अयोध्येला जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रोहित पवार यांनी स्वत: ट्विटरवरून आपल्या या तिर्थयात्रेची माहिती दिली आहे. भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश जिथून दिला त्या सारनाथमधून (उत्तरप्रदेश) सम्राट अशोक यांनी उभ्या केलेल्या अशोक स्तंभाच्या आणि धामेख स्तूपाच्या साक्षीने लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिशताब्दीनिमित्त अभिवादन केलं, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश जिथून दिला त्या सारनाथमधून (उत्तरप्रदेश) सम्राट अशोक यांनी उभ्या केलेल्या अशोक स्तंभाच्या आणि धामेख स्तूपाच्या साक्षीने लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिशताब्दीनिमित्त अभिवादन केलं!#कृतज्ञता_पर्व#वंदन_लोकराजाला pic.twitter.com/GBXhtrC5V5
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2022
अध्यात्मिक इतिहासाची ओळख झाली
भगवान श्रीकृष्णाचं चरित्र समजून घ्यायला मला आवडतं आणि श्रीकृष्णाच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करण्याचा माझा प्रयत्न असतो. या मंदिराला भेट देऊन दर्शन घेताना आत्मिक आनंद मिळालाच. पण आपल्या अध्यात्मिक इतिहासाची ओळख झाल्याने हा आनंद द्विगुणीत झाला. … म्हणून सहकुटुंब चार दिवसांच्या तिर्थयात्रेचं नियोजन केलं, असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उद्या अयोध्येत
आज सारनाथला भेट दिल्यानंतर रोहित पवार उद्या अयोध्येला जाणार आहेत. अयोध्या दौऱ्यात ते राम मंदिर आणि घाटांनाभेट देणार आहेत. उद्या दुपारी 12 वाजता ते अयोध्येत दाखल होणार आहेत.