डॉक्टर कपल हनीमूनसाठी गेलं, ते आलंच नाही; आयुष्याची साथ ठरली फक्त आठच दिवसाची; असं काय घडलं?
चेन्नईत राहणाऱ्या एका डॉक्टर कपलचं 1 जून रोजी लग्न झालं. त्यानंतर दोघेही हनीमूनसाठी बालीला गेले. तिथेच दोघांचा मृत्यू झाला. दोघांच्या लग्नाला आठ दिवसही झाले नव्हते, तोच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
चेन्नई : लग्नानंतर हातावरची मेहंदीही निघाली नव्हती, अजून संसार सुरू करायचाच होता, पण त्यापूर्वीच डॉक्टर कपलने या जगाचा निरोप घेतला. 1 जून रोजी या दोघांचं लग्न झालं होतं. त्यानंतर ते हनीमूनसाठी बालीला गेले होते. हनीमूनवेळी त्यांनी फोटोही काढले. स्पीड बोटमधून प्रवास करताना फोटो काढण्यासाठी समुद्रात उतरले. पण त्यांना काय माहीत हा त्यांचा शेवटचा प्रवास असेल…
लोकेश्वरन आणि विबुश्निया असं या डॉक्टर कपलचं नाव आहे. पूनमल्लीच्या एका मॅरेज हॉलमध्ये 1 जून रोजी त्यांचं मोठ्या थाटात लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही बालीला हनीमूनसाठी गेले होते. पण लग्नाला आठ दिवस होत नाही तोच त्यांचा बालीत समुद्रात बुडून मृत्यू झाला. फोटोशूट करत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना फोनद्वारे कळवण्यात आली. या दोघांच्या घरी त्यांच्या मृत्यूची खबर जाताच संपूर्ण घरावर शोककळा पसरली. लग्नासाठी सजवलेल्या घरात काही सेकंदात मातम आणइ आक्रोश सुरू झाला.
मृत्यू नेमका कसा झाला?
त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी तात्काळ बालीला धाव घेतली. लोकेश्वरन याचा मृतदेह शुक्रवारी तर विबुश्निया हिचा मृतदेह शनिवारी सकाळी ताब्यात घेण्यात आला. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पीड बोट समुद्रात बुडाल्याने ही दुर्घटना घडली. तर काहींच्या मते फोटोशूटसाठी हे कपल समुद्रात गेले होते. तिथे त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची विस्तृत आणि अधिकृत माहिती अजून यायची बाकी आहे. या दोघांचेही मृतदेह चेन्नईला नेण्याची दोन्ही कुटुंबांनी तयारी सुरू केली आहे. तसेच या कुटुंबाने मृतदेह चेन्नईला आणण्यासााठी मदत करावी म्हणून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारडे मागणी केली आहे.
आधी मलेशियात मृतदेह आणणार
इंडोनेशियामधून थेट चेन्नईला येण्यासाठी फ्लाईट नाहीये. त्यामुळे दोघांचे मृतदेह आधी मलेशियाला आणले जातील. त्यानंतर भारतात आणले जाईल. या घटनेमुळे चेन्नईच्या सेन्नेरकुप्पवर शोककळा पसरली आहे. विबुश्निया ही सेन्नेकुप्पमधील रहिवासी आहे. दोन्ही डॉक्टर कपलच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रडून रडून त्यांचे हाल झाले आहेत. लग्नानंतर एका आठवड्यातच लोकेश्वरन जग सोडून गेल्याच्या घटनेवर लोकेश्वरनच्या मित्राचाही विश्वास बसत नाहीये.