काय झाले शाळेत मुली आरडाओरड करु लागल्या, एकपाठोपाठ शंभर मुली बेशुद्ध, गावकरी म्हणतात…
School | एका शाळेत वेगळाच प्रकार घडला आहे. एकापोठापाठ शंभर मुली बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्या मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारींनी दिले आहेत.
नवी दिल्ली, दि. 7 जानेवारी 2024 | आसाममधील एका शाळेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत गुणप्रदर्शनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी एकाएकी विद्यार्थीनी आरडाओरड करु लागल्या. जमिनीवर लोटपोट लोळू लागल्या. एकापाठोपाठ शंभर मुली बेशुद्ध झाल्या. त्यातील अनेक मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही विद्यार्थीनी उपचार न करता बऱ्या झाल्या. हा प्रकार का घडला याचे कोणतेही कारण समोर आले नाही. गावकरी याला भुताटकीचा प्रकार म्हणत आहे. गावकऱ्यांचा हा दावा डॉक्टरांनी फेटाळला आहे. डॉक्टरांनी हा एक मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे. परंतु या प्रकारामुळे मुली शाळेत येण्यास तयार नाहीत. आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील रामकृष्ण नगर येथील रामकृष्ण नगर विद्यापीठातील शाळेत हा प्रकार घडला आहे.
मुलींच्या व्यवहारात अचानक बदल
रामकृष्ण नगर विद्यापीठाच्या शाळेत मुलींच्या व्यवहारात अचानक बदल झाला. शाळेतील शिक्षक म्हणतात, काही विद्यार्थीनी अचानक विचित्र वर्तन करु लागल्या. त्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या. त्या मुलींना रुग्णालयात नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेच्या वेळीही असाच प्रकार घडला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुली शाळेत येण्यास तयार नाहीत.
प्रशासनाकडून दखल, उपजिल्हाधिकारी घटनास्थळी
शाळेतील या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. उपजिल्हाधिकारी ध्रुवज्योती पाठक यांनी आपल्या टीमसोबत शाळेचा आणि रुग्णालयाचा दौरा केला. डॉक्टरांनी हा एक मानसिक आजार असल्याचे सांगितले. मेंटर प्रेशरमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली. जिल्हाधिकारी मृदुल यादव यांनी या प्रकारानंतर तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
गावकऱ्यांनी केला भुताटकीचा दावा
शाळेतील हा प्रकार म्हणजे भुताटकी असल्याचा दावा पालक आणि गावातील लोकांनी केला आहे. हा सर्व प्रकार भूतामुळे होत आहे. यामुळे शाळेत आणि परिसरात पूजापाठ करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. या शाळेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यांची आत्मा शाळेत भटकत असल्याचा दावा गावकरी अंधश्रद्धेतून करत आहेत.