सर्वात मोठी बातमी! मंदिराच्या घुमटाला विमान धडकलं, पायलटचा जागीच मृत्यू; ट्रेनीही गंभीर
जर हे विमान घरांवर कोसळलं असतं तर मोठी दुर्घटना झाली असती. त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला असता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली.
भोपाळ: नव्या वर्षातील एक दुर्देवी घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील एका मंदिराच्या घुमटाला प्रशिक्षणार्थी विमानाची धडक बसल्याने सीनियर पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात एक ट्रेनी गंभीर जखमी झाला आहे. या जखमींना तात्काळ संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यातील चोरहटा येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाला. हे विमान पाल्टन प्रशिक्षण कंपनीचं असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
गुरुवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान ही दुर्देवी घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. चोरहटा विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतलं होतं. मात्र, दाट धुक्यांमुळे विमान खालीच राहिलं. ते अधिक उंचावर उडू शकलं नाही. यावेळी या विमानाने आधी एका आंब्याच्या झाडाला धडक दिली. त्यानंतर हे विमान मंदिराच्या घुमटाला जाऊन धडकलं आणि क्रॅश झालं.
मंदिराच्या घुमटाला विमानाने धडक दिल्यानंतर या मंदिराचा घुमट कोसळून पडला. एवढेच नव्हे तर ही धडक एवढी जोरदार होती की विमानाचे पातेच उडून पडले. तसेच विमानाचा काही भाग चक्काचूर झाला. या विमानाने मंदिरा ऐवजी इतर ठिकाणी धडक दिली असती तर मोठी दुर्घटना झाली असती. कारण विमान कोसळलं त्या परिसरातील काही अंतरावर घरे होती.
जर हे विमान घरांवर कोसळलं असतं तर मोठी दुर्घटना झाली असती. त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला असता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली.
या अपघातात सीनियर पायलटचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तसेच दोन जणांना संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील प्रशिक्षणार्थी पायलटची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.
मृतक पायलट आणि ट्रेनी पायलटच्या बाबतची माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. दाट धुक्यांमुळे विमान कोसळलं की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.