पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या गाडीचा भीषण अपघात, कुटुंबातील अनेक सदस्य जखमी
कर्नाटकच्या मैसूर शहरातून एक मोठी बातमी समोर येतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा भीषण अपघात झालाय.
मैसूर (कर्नाटक) : कर्नाटकच्या मैसूर शहरातून एक मोठी बातमी समोर येतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात मोदींच्या कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. या अपघातात प्रल्हाद मोदी हे देखील जखमी झाले आहेत. संबंधित घटना ही मैसूरमध्ये आज दुपारच्या सुमारास घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडीत प्रवास करणारे सर्वचजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोदी आपल्या पत्नी, मुलं, सून आणि नातवासोबत त्यांच्या मर्सिडीज बेंज कारने बांदीपुरा जात होते. या दरम्यान मैसूरमध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांची गाडी रस्ता दुभाजकाला धडकली. यावेळी त्यांचा ताफा देखील त्यांच्यासोबत होता.
PM Modi’s relatives injured in an accident. Their car was travelling towards Bandipur when the accident happened. Prahlad Modi, His son and daughter in law injured in the accident. They have been rushed to hospital #Karnataka pic.twitter.com/hLJ9IuqJQj
— Imran Khan (@KeypadGuerilla) December 27, 2022
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोदी यांच्या नातवाचा पाय फ्रॅक्चर झालाय. तर इतर जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर सर्वांना मैसूरच्या जे एस रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
या अपघातानंतरचे अपघातग्रस्त गाडीचे फोटो समोर आले आहेत. गाडीचं झालेलं नुकसान पाहता ही अपघाताची घटना किती भीषण होती याची प्रचिती येतेय. रस्ता विभाजकाला धडकल्याने गाडीचा पुढचा भाग चक्काचूर झालाय.
संबंधित अपघाताची माहिती मिळताच मैसूरचे पोलीस अधीक्षक सीमा लटकर घटनास्थळी दाखल झाले. मैसूरच्या कडाकोला परिसरात अपघाताची घटना घडलीय. प्रल्हाद मोदी हे गुजरातच्या फेयरप्राईस शॉप्स अॅण्ड कॅरोसिन लायसन्स होल्डर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.