मानलं बुवा! 65 तासात आटपल्या 24 बैठका; अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदींकडून वेळेचं अचूक व्यवस्थापन
PM Modi US tour | विमानात कागदपत्रे चाळतानाचे छायाचित्र असो किंवा जो बायडन यांच्यासोबत झालेली चर्चा असो, पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक कृतीचे विश्लेषण आणि अर्थ काढला जात होता. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात पुन्हा एकदा आपल्या टाईम मॅनेजमेंटची झलक दाखवून दिली.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला होता. पंतप्रधान मोदी अमेरिकेला जाण्यासाठी अगदी विमानात बसल्यापासून ते पुन्हा मायदेशी परतेपर्यंत प्रसारमध्यमांचे संपूर्ण लक्ष नरेंद्र मोदी यांच्याकडेच लागले होते. विमानात कागदपत्रे चाळतानाचे छायाचित्र असो किंवा जो बायडन यांच्यासोबत झालेली चर्चा असो, पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक कृतीचे विश्लेषण आणि अर्थ काढला जात होता. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात पुन्हा एकदा आपल्या टाईम मॅनेजमेंटची झलक दाखवून दिली.
अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी एकूण 20 बैठकांमध्ये सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर वॉशिंग्टनपर्यंतच्या लांबच्या प्रवासादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विमानतच चार बैठका आटपून घेतल्या. या सगळ्याची गोळाबेरीज केल्यास पंतप्रधान मोदी यांनी 65 तासांत 24 बैठका घेतल्या असे म्हणावे लागेल. अमेरिकेत असताना प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक क्षणाचा पूरेपूर वापर करण्यात कोणतीही कसूर सोडली नाही. अगदी अमेरिकेहून भारतात परतत असतानाही पंतप्रधान मोदी यांचे शेड्युल बिझी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कसं होतं पंतप्रधान मोदींचं टाईम मॅनेजमेंट?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबरला अमेरिकेला जाण्यासाठी विमानात बसले. यावेळी त्यांना पुढील कार्यक्रम सांगण्यात आला. या सगळ्याचा विचार करुन पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वीच विमानात दोन बैठका घेतल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमध्ये उतरले तेव्हा हॉटेलमध्येच असताना ते तीन बैठकांमध्ये सहभागी झाले होते.
23 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांनी जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांची भेट घेतली. या भेटीगाठीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबत असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांसोबत तीन बैठका घेतल्या. तर 24 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये गेले होते. त्यानंतर क्वाड देशांच्या परिषदेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय अधिकाऱ्यांसोबत आणखी चार बैठका घेतल्या.
मायदेशी परतताना विमानात दोन बैठका
25 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेहून नवी दिल्लीला परतताना आणखी दोन बैठका घेतल्या. या बैठकाही बराच काळ चालल्या. या दोन्ही बैठकांमध्ये अमेरिका दौऱ्याचा आढावा घेण्यात आला. रविवारी दिल्लीला परतल्यानंतरही पंतप्रधान पुन्हा दैनंदिन कामकाजात रमून गेले. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या या न थकता काम करण्याच्या वृत्तीचे सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे.
संबंधित बातम्या:
PHOTO: अमेरिकेत पंतप्रधान मोदींना मिळाला मौल्यवान नजराणा, दुर्मिळ वस्तूंचा खजिना घेऊन मायदेशी परतणार
Mann ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मध्ये काय म्हणाले, जाणून घ्या 10 प्रमुख गोष्टी
Mann ki Baat: पंतप्रधान मोदींकडून कौतूक, जाणून घ्या झारखंडमधील अॅलोवेरा व्हिलेजबद्दल