India-Pakistan: पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची उझबेकिस्तानात होणार भेट?, कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ यांची भेट झाली तर कोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. यात सीमापार व्यापार, सुरक्षा, दहशतवाद यासारख्या मुद्द्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
इस्लामाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची (Pakistani PM)बराच काळ भेट झालेली नाही. इम्रान खान सत्तेतून पायउतार झाल्यानंतर आता शहबाज शरीफ हे पाक्सितानचे पुंतप्रधान झालेले आहेत. आता शहबाज शरीफ यांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. उझबेकिस्तानात समरकंद येथे होणाऱ्या शंघाई सहयोग संघटनेच्या बैठकीत ही भेट (meeting)होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मोदी आणि शरीफ यांची भेट झाल्यास बऱ्याच काळापासून सुरु असलेले दोन्ही देशातील शत्रुत्व संपेल का, हा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.
कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा
जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ यांची भेट झाली तर कोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. यात सीमापार व्यापार, सुरक्षा, दहशतवाद यासारख्या मुद्द्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दोन्ही सरकारांच्या वतीने देण्यात आलेली नाही. पुढच्या महिन्यात १५ आणि १६ सप्टेंबरला ही बैठक उजबेकिस्तानात पार पडणार आहे. या बैठकीत पाकिस्तानसह चीन, रशिा आणि इराणचे राष्ट्रपतीही सहभागी होणार आहेत. एप्रिलमध्ये अविश्वास प्रस्तावानंतर इम्रान खान पायउतार झाले होते, त्यानंतर शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत.
पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी केले होते अभिनंदन
शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले होते. त्यात मोदींनी लिहिले होते की, मिया मोहम्मह शहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या परिसरात शांती आणि स्थिरता राहावी अशी भारताची भूमि्का आहे. तसेच हा परिसर दहशतवादापासून मुक्त असावा असाही उल्लेख करण्यात आला होता. असे झाल्यास विकासाच्या आव्हानांवर लक्ष केंद्रीत करता येईल आणि जनतेची समृद्धी निश्चित करता येईल. याला शरीफ यांनीही उत्तर देत आभार मानले होते. शरीफ यांनी लिहिले होते की – पाकिस्तान भारतासोबत शांतता आणि सहकार्याचे संबंध अपेक्षित करतो. भारत आणि पाकिस्तानातील संबंध अनेकदा तणावपूर्णच असतात आणि गेल्या अनेक काळापासून दोन्ही देशांतील व्यापार बंद आहे.
२०१९ नंतर व्यापार सुरु करण्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत
गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने स्पष्ट केले होते की, २०१९ नंतर पाकिस्तानशी पुन्हा व्यापार सुरु करण्याबाबत कोणतीही प्रगती झालेली नाही. राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्रमंत्री व्ही मुरलीधरन यांनी हे उत्तर दिले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये पाकिस्तानने भारताशी द्विपक्षीय व्यापार स्थगित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये औषधांच्या व्यापारासाठी या प्रतिबंधातून थोडी सूट देण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानशी पुन्हा व्यापार करण्याबाबत कोणतीही प्रगती झालेली नाही.