PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना स्वत:च्या मालकीची गाडी, ना शेअर्स, आहे 35 हजार कॅश, 1.1 कोटींची जमीन केली दान, जाणून घ्या संपत्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सर्व केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने (PM office)याही वर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची संपत्ती किती याची माहिती जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर पंतप्रधानांची संपत्ती जाहीर करण्यात आलेली आहे.
नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते पंतप्रधान असा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा प्रवास आहे. नेहमी साधेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि अनेकांची मने घेणाऱ्या पंतप्रधानांकडे किती संपत्ती आहे, हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असतेच. देशातील काळे पैसे परत आणण्यासाठी त्यांनी नोटाबंदीसारखा (Notabandi)निर्णय घेतला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सर्व केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची संपत्ती जाहीर करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने (PM office)याही वर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची संपत्ती किती याची माहिती जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर पंतप्रधानांची संपत्ती जाहीर करण्यात आलेली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती 2 कोटी 23 लाख 82 हजार 504 रुपये असल्याचे यात जाहीर करण्यात आलेले आहे. यात गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या संपत्तीत थोडी वाढ झाल्याचे दिसते आहे. मात्र त्यांनी गेल्या वर्षात एक जमीन दान केल्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.
संपत्तीत 26 लाख 13 हजारांनी वाढ
यातील बहुतांश संपत्ती ही बँकेत जमा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही स्थावर मालकत्ता नसल्याचेही समोर आले आहे. गुजरातमध्ये गांधीनगर येथे असलेली मोदींच्या वाट्याची असलेली जमीन त्यांनी दान केली आहे. या जमिनीची किंमत 1.1 कोटी इतकी होती. सध्या त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीत गेल्या वर्षीपेक्षा 26 लाख 13 हजारांनी वाढ झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
गेल्या वर्षात केले 1.1 कोटी जमिनीचे दान
31 मार्च 2021 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 1.1 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन होती. ही जमीन त्यांनी दान केली आहे. २००२ साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर अजून 3 जणांना मालकी हक्क होता. जमिनीपैकी 25 टक्क्यांवर मोदींचा अधिकार होता. ती जमीन त्यांनी दान केली आहे.
ना वाहन, ना म्युचुअल फंड
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वताचे कोणतेही वाहन नाही. त्यांनी कुठल्याही शेअर्स, बॉण्ड्स किंवा म्युचअल फंडमध्ये पैसे गुंतवलेले नाहीत. पंतप्रधानांकडे 4 अंगठ्या मात्र आहेत, त्यांची किंमत 1.73 लाख रुपये इतक आहे.
1.89 लाखांचा विमा
31 मार्च 2022 पर्यंत दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकूण 35 हजार 250 रुपयांची रोख रक्कम आहे. तर पोस्टात त्यांच्या नावे 9 लाख 5 हजार 105 रुपयांचे सेव्हिंग सर्टिफिकेट जमा आहेत. मोदी यांच्या नावाने 1 लाख 89 हजार रुपयांना जीवन विमाही आहे.