Punjab election result: सनी देओलच्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला अवघी 9 मतं
गुरुदासपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधून भाजपच्या किरण कौर या रिंगणात उतरल्या होत्या. | Punjab election result
चंदीगड: गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजपला (BJP) बसला आहे. पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपचे अक्षरश: पानिपत झाले. एवढेच नव्हे तर खासदार सनी देओल (Sunny Deol) यांचा मतदारसंघ असणाऱ्या गुरुदासपूरमध्ये भाजपच्या उमेदवाराला अवघी नऊ मते मिळाली. (punjab election result bjp candidate in gurdaspur muncipal council just get 9 vote)
गुरुदासपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधून भाजपच्या किरण कौर या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्यावर अवघी नऊ मते मिळण्याची नामुष्की ओढावली. या पार्श्वभूमीवर किरण कौर यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. माझ्या घरातच 15 ते 20 मतदार आहेत. या सर्वांनी मला मत दिले होते. याशिवाय, आमच्या सर्व शेजाऱ्यांनीही मला मत देण्याचे वचन दिले होते. मग मला फक्त 9 मते पडूच कशी शकतात, असा सवाल किरण कौर यांनी उपस्थित केला. तसेच काँग्रेस पक्षाकडून खोट्या सह्या आणि मतदान यंत्र (EVM) बदलण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.
काँग्रेसला घवघवीत यश, भाजपला लोळवले
पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवले. पालिकेच्या एकूण 2165 वॉर्डपैकी 1,399 वॉर्डात काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे निवडणूक झालेल्या आठपैकी सहा पालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकला.
गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलच्या भाजपला नाकारलं
सनी देओल यांच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकीत याच गुरदासपूरच्या नागरिकांनी सनी देओलला मोठ्या अभिमानाने निवडून दिलं होतं. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. सनी देओल यांच्या मतदारसंघात सर्व 29 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे.
अकाली दलालाही मोठा फटका
भटिंडामध्ये 50 जागांवर झालेल्या निवडणुकीत तब्बल 47 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. तर अकाली दलाला फक्त 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजप आणि आप तर इथे खातंही उघडू शकली नाही. अबोहर नगर पालिका निवडणुकीत 50 जागांपैकी काँग्रेसनं तब्बल 49 जागा जिंकल्या आहेत. तर अकाली दलाच्या वाट्याला फक्त एक जागा आली आहे.
संबंधित बातम्या:
पंजाबमध्ये भाजपचं पानीपत? सनी देओलच्या मतदारसंघातील सर्व 29 जागांवर पराभव
पंजाबमध्ये भाजप भूईसपाट, तर हरसिमरत कौर यांच्या मतदारसंघातच अकाली दल बॅकफुटवर!
गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचं युवकांसाठी थेट ‘डेटिंग डेस्टिनेशन’चं आश्वासन!
(punjab election result bjp candidate in gurdaspur muncipal council just get 9 vote)