राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते थेट ‘किसान संसद’ला, कृषी कायद्यांविरोधात एकजूट
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते आज (6 ऑगस्ट) दुपारी थेट जंतरमंतरवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले.
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते आज (6 ऑगस्ट) दुपारी थेट जंतरमंतरवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ‘किसान संसदे’ला भेट दिली. तसेच नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला. यावरुन विरोधक कृषी कायद्याविरोधात एकवटल्याचं दिसतंय.
शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच किसान संसद भरवली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होत आहे. तसेच शेतकरी संघटना तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यासोबत हमीभावाची मागणी करत आहेत.
विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा
‘किसान संसदेत’ बोलताना राहुल गांधी म्हणाले, “विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा दिलाय. तसेच तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यावर भर दिलाय. विरोधी पक्ष शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आले होते. हे तिन्ही कायदे रद्द व्हावेत. याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. सरकार संसदेत विरोधी पक्षाचं ऐकत नाहीये. पेगसस स्पायवेअरवर चर्चा करत नाहीये.”
राहुल गांधी यांच्यासह राज्यसभा विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, द्रमुक नेता तिरुची शिवा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राजदचे मनोज झा, भाकपाचे विनय विश्वम, माकपाचे ई. करीम, समाजवादी पार्टीचे एसटी हसन आणि इतर विरोधी पक्षनेते यावेळी सहभागी झाले होते.
हेही वाचा :
कृषी विधेयकांची घाई थांबवा, अन्यथा दिल्लीप्रमाणे मुंबईच्या सीमा रोखू, शेतकरी संघटनांचा राज्य सरकारला इशारा
VIDEO : संसद परिसर बनला आखाडा, कृषी कायद्यांवरून हरसिमरत कौर बादल आणि रवनीत बिट्टू भिडले, पाहा व्हिडीओ
आंदोलक शेतकरी पुन्हा आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची, बॅरिकेट्स तोडले, हरियाणात नेमकं काय घडलं?
व्हिडीओ पाहा :
Rahul Gandhi and opposition parties attend Kisan Sansad Farmer Parliament