केवळ ऋषी सुनकच नव्हे तर ‘या’ 8 भारतीयांचंही अनेक देशांवर राज्य; काही राष्ट्रपती तर काही पंतप्रधान
भारतीय वंशाचे वेवल रामकलावन हे भारतीय वंशाचे सेशेल्समधील मोठे नेते आहेत. 26 ऑक्टोबर 2020मध्ये ते सेशेल्सचे राष्ट्रपती बनले होते.
नवी दिल्ली: भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे पंतप्रधान बनले आहेत. एखाद्या भारतीयाने ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची (UK Prime Minister) धुरा सांभाळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्या ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं. त्याच ब्रिटनचा कारभार आता एका भारतीय वंशाच्या (indian origin) व्यक्तीच्या हाती आला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतातून जल्लोष करण्यात येत आहे. पण केवळ सुनकच नाही तर इतर भारतीयांनीही जगातील वेगवेगळ्या देशात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. काही राष्ट्रपती झाले तर काही पंतप्रधानही झालेले आहेत.
लियो वराडकर
लियो वराडकर हे भारतीय वंशांचे आयर्लंड नेते आहेत. सध्या ते आयर्लंडमध्ये मोठ्या पदावर आहेत. 2017 ते 2020पर्यंत ते आयर्लंडचे संरक्षण मंत्री होते. लियो यांचा जन्म डबलिन येथे झाला. त्यांचे वडील अशोक यांचा जन्म मुंबईत झाला होता. 1960मध्ये त्यांचे वडील यूकेला गेले होते.
वेवल रामकलावन
भारतीय वंशाचे वेवल रामकलावन हे भारतीय वंशाचे सेशेल्समधील मोठे नेते आहेत. 26 ऑक्टोबर 2020मध्ये ते सेशेल्सचे राष्ट्रपती बनले होते. राष्ट्रपती बनण्यापूर्वी रामकलावन हे विरोधी पक्षनेते होते. तसेच अनेक वेळा खासदारही झालेले आहेत. रामकलावन यांचं मूळ भारतातील बिहारमध्ये आहे. त्याांचे आजोबा बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील होते. रामकलावन हे पुजारीही होते. गेल्या दोन दशकापासून ते राजकारणात सक्रिय आहेत.
मोहम्मद इरफान अली
मोहम्मद इरफान अली यांनी 2 ऑगस्ट 2020मध्ये साऊथ अमेरिकेच्या गयानाचे नववे कार्यकारी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मोहम्मद इरफान अली अर्धे भारतीय मुस्लिम आहेत. तसेच ते अर्धे गयानाचेही आहेत. त्यांचा जन्म वेस्ट कोस्ट डॅमेराराच्या लिओनाोरा मध्ये झाला होता.
अँटोनियाो कोस्टा
पोर्तुगालचे विद्यमान पंतप्रधान अँटोनियो कोस्टा हे भारताशी संबंधित आहेत. त्यांनी 26 नोव्हेंबर 2015मध्ये पोर्तुगाचे 119 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. कोस्टा हे अर्धे पोर्तुगीज आणि अर्धे भारतीय आहेत. त्यांचे वडील गोव्याचे होते. त्यांचा जन्म आफ्रिकी देश मोझांबिकमध्ये झाला होता. अँटोनिया कोस्टा यांना गोव्यात बाबूश म्हणून ओळखलं जातं.
प्रविंद जुगनाथ
भारतीय वंशाचे प्रविंद जुगनाथ हे मॉरिशसचे पंतप्रधान आहेत. प्रविंद जुगनाथ हे उत्तर प्रदेशाशी संबंधित आहे. त्यांचा जन्म अहिर हिंदू कुटुंबात झाला होता. एप्रिल 2022मध्ये प्रविंद हे आठ दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.
हलीमा याकूब
हलीमा याकूब या भारतीय वंशाच्या आहेत. त्या 2017पासून सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदी आहेत. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या सिंगापूरच्या संसदेतील स्पीकर होत्या. विशेष म्हणजे हलीमा या सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांचे वडील भारतीय मुस्लिम होते.
पृथ्वीराज सिंह रुपन
भारतीय वंशाचे पृथ्वीराज सिंह रुपन हे मॉरिशसचे सातवे राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. 2019 पासून ते या पदावर आहेत. पृथ्वीराज सिंह रुपन हे भारतीय आर्य समाजी कुटुंबातील आहेत. 2000मध्ये ते पहिल्यांदा नॅशनल असेंबलीचे सदस्य बनले. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही.
चंद्रिकाप्रसाद चन संटोखी
भारतीय वंशाचे चंद्रिकाप्रसाद चन संटोखी दक्षिण अमेरिकेच्या सूरीनाम देशाचे राष्ट्रपती आहेत. संटोखी यांचा जन्म 1959मध्ये सूरीनाममध्येच एका भारतीय-सूरीनाम कुटुंबात झाला. राजकारणात येण्यापूर्वी ते पोलीस अधिकारी होते.