हिंदू खतरे में है… तर मग राजीनामा द्या, हिंदुत्वाचं नावही घेऊ नका; संजय राऊत यांचा हल्लाबोल
सरकार काही गोष्टी लपवत आहे. तथ्य लपवायची नसती तर आतापर्यंत मणिपूरचं सरकार बरखास्त केलं असतं. मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी केली असती. पण त्यांनी तसं काही केलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.
नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : कमलनाथ म्हणाले या देशात 80 टक्के हिंदू आहेत. त्यामुळे हे हिंदू राष्ट्र आहे. आम्ही वेगळं काय म्हणत होतो? काँग्रेसचं सरकार असताना भाजपवाले म्हणत होते, हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है… हा भाजपचा नारा होता. आता दहा वर्षापासून तुमचं सरकार आहे. मग हिंदू खतरे में कसा आला? का आला? या देशात 80 टक्के हिंदू आहेत. तरीही तुम्ही हिंदू-मुस्लिमांच्या दंगली का भडकवत आहात? जर हिंदू खतरे में है तो राजीनामा द्या. हिंदुत्वाचं नावही घेऊ नका, असा हल्लाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर चढवला.
शिवसेनेनेच युती तोडली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यावरही संजय राऊत यांनी पलटवार केला. शिवसेनेने युती तोडली असं पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर ते दिशाभूल करत आहेत. 2014ची परिस्थिती पंतप्रधानांना आठवायला हवी. 2014मध्ये युती कोणी आणि का तोडली हे संपूर्ण देशानं पाहिलं. त्यानंतर शिवसेना स्वतंत्रपणे लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झाले आहोत, असं भाजपतर्फे अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितलं. त्यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडली या संदर्भात जुना रेकॉर्ड पंतप्रधानांनी तपासून पाहावा. महाराष्ट्र सदनात फुले, शाहू, शिवाजी महाराज, आंबेडकर यांचे पुतळे आहेत. त्यांच्या साक्षीने तरी इतिहास आणि सत्य मोडून तोडून टाकू नये, असा टोलाच संजय राऊत यांनी लगावला.
आम्ही ओरिजनल म्हणूनच
‘सामना’च्या भूमिका या शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहेत. पंतप्रधानांनाही ‘सामना’ आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर चर्चा करावी लागते. कारण आम्ही ओरिजनल आहोत. उद्धव ठाकरे यांच्या भूमिका लोकांना मान्य आहेत, त्यामुळे तुम्हाला आमची दखल घ्यावी लागत आहे. कितीही हल्ले केले तरी ‘सामना’ आणि शिवसेना शरण जात नाही ही त्यांची वेदना मोदींनी बोलून दाखवली. मी पंतप्रधानांचा आभारी आहे. ते नेहमी ‘सामना’ वाचतात. ‘सामना’ची दखल घेतात आणि आपल्या सहकाऱ्यांनाही ‘सामना’ माझ्यावर टीका करत असतो असं सांगतात, असा चिमटा त्यांनी काढला.
तो पवार आणि काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न
शरद पवार यांच्यात क्षमता असूनही काँग्रेसने त्यांना पंतप्रधान केलं नाही, या मोदी यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? पवारांविषयी एवढा आदर आहे, म्हणून पक्ष फोडला का? शरद पवार आणि काँग्रेसचं वेगळं राजकारण आहे. लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखलं किंवा त्यांना संन्यास घ्यायला लावला असं आम्ही म्हणतो का? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसे शरद पवार आणि काँग्रेस हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.
तुमचा स्वातंत्र्याशी संबंध काय?
तुषार गांधी यांच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. ज्या गांधींनी चले जावची गर्जना केली, त्या गांधींचे पणतू तुषार गांधी यांना रोखलं जात असेल तर आश्चर्य आहे. यांचा संबंध काय? भारत छोडो किंवा चले जावच्या चळवळीला संघ परिवाराचा विरोध होता. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी ब्रिटिशांना त्या काळात पत्र लिहिली होती. ती रेकॉर्डवर आहे.
चले जावचं आंदोलन चिरडून टाकलं पाहिजे, भारत छोडोला आमचा विरोध आहे. ब्रिटिशांनी या आंदोलनाला महत्त्व देऊ नये, असं मुखर्जी यांनी पत्रात म्हटलं होतं. ज्यांचा स्वातंत्र्यांच्या आंदोलनात काहीच भाग नव्हता, ते आज ऑगस्ट क्रांतीदिनी पुष्पचक्र वाहतात. हा महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वात मोठा विनोद आहे. आणि तुषार गांधींना रोखलं गेलं हा सर्वात मोठा विनोद आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.