Wrestlers Protest : नको तिथे स्पर्श… बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध दोन एफआयआर; 7 गंभीर आरोप काय?
भाजपचे खासदार आणि रेसलिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे बृजभूषण यांच्या विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचं आंदोलन अजूनही थांबलेलं नाही. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. बृजभूषण यांच्या विरोधात ऑनलाईनने एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये लैंगिक शोषणापासून ते छेडछाडीसह सात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे बृजभूषण यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
बृजभूषण सिंह यांच्यावर एकूण सात गंभीर आरोप केले आहे. त्यात छेडछाड केल्याची तक्रार करण्यात आली आहे. चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, बहाना करून छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, छातीपासून पाठीपर्यंत हात फिरवणे आणि पाठलाग करणे आदी गंभीर आरोप बृजभूषण यांच्यावर करण्यात आले आहेत.
काय आहे शिक्षेची तरतूद?
बृजभूषण यांच्याविरोधात कनॉट प्लेसच्या पोलीस ठाण्यात 21 एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी 28 एप्रिल रोजी दोन एफआयआर दाखल केले होते. दोन्ही एफआयआर आयपीसीच्या कलम 354 अन्वये करण्यात आल्या होत्या. तसेच भादंवि कलम 354 ए, 354 डी, आणि 34 अन्वये तक्रार दाखल करण्यात आळी होती. या गुन्ह्यात एक ते तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. पहिल्या एफआयआरमध्ये सहा ज्येष्ठ कुस्तीपटूंच्या आरोपांचा समावेश आहे. त्यात डब्ल्यूएफआयचे सचिव विनोद तोमर यांच्या नावाचाही समावेश आहे.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांची तक्रार
दुसरी एफआयआर अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवर आधारीत आहे. या तक्रारीला पॉस्कोचा अधिनियम 10 लागू होतो. या कलमानुसार पाच ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. तक्रारीत ज्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या कथितरित्या 2012 पासून ते 2022पर्यंत भारत आणि परदेशात घडलेल्या आहेत.
अल्पवयीन मुलीच्या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले आहे. आरोपीने आपल्याला घट्ट पकडून ठेवलं, फोटो काढण्याचं नाटक केलं, आपल्याकडे खेचलं, खांद्याला जोराने दाब दिला, जाणूनबुजून शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आदी गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आले आहेत.
सहा महिला कुस्तीपटूंची तक्रार
सहा महिला कुस्तीपटूंनी तक्रारी केल्या आहेत. पहिल्या महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीने रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवायला बोलावलं. त्यानंतर आपल्या मेजावर बसवून स्पर्श केला. छातीपासून पोटापर्यंत स्पर्श केला. शरारीच्या इतर अंगानाही स्पर्श केला. माझ्या पायाला पायानेही स्पर्श केला. माझ्या श्वासाचा पॅटर्न समजण्यासाठी चुकीचे स्पर्श केले, असं या महिलेने म्हटलं आहे. सहाही महिलेने अशाच प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. जबरदस्ती खेचणं, अंगाला हात लावणं, चुकीचा स्पर्श करणं आदी गंभीर आरोपांचा यात समावेश आहे.