क्रिकेटचा ‘दादा’ राजकारणात उतरणार? बंगालच्या राज्यपालांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
पश्चिम बंगालमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे (Sourav Ganguly meet governor Jagdeep Dhankhar)
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सौरभ गांगुलीने आज (27 डिसेंबर) पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. त्यामुळे गांगूली भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्याकडून वारंवार बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्यांनी अनेकवेळा राज्यातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत (Sourav Ganguly meet governor Jagdeep Dhankhar).
पश्चिम बंगालमध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपकडून सौरभ गांगूलीला राजकीय आखाड्यात उतरवलं जाईल, अशा चर्चा सुरु आहेत. भाजप सौरभ गांगुलीच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याच्या इराद्यात आहे. मात्र, गांगुलीकडून याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अमित शाहांचा 12 जानेवारीला बंगाल दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव देखील बीसीसीआयचे पदाधिकारी आहेत. मात्र, त्याबाबतच्या संबंधांबाबत सौरभ गांगूलीकडून कधीच कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दुसरीकडे अमित शाह 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हावडा येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात काही लोकांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
सौरभ गांगुलीच अमित शाहांचे बंगालचे भूमिपुत्र?
अमित शाह यांनी कोलकाता दौऱ्यादरम्यान बंगालचा भूमिपुत्रच बंगालचा मुख्यमंत्री होईल, असं सूचक विधान केलं होतं. त्यामुळे बंगालचा भूमिपुत्र सौरभ गांगुलीच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या बाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार वैशाली डामलिया यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे वैशाली यांचे गांगुली कुटुंबाशी चांगले संबंध आहे. याशिवाय टीएमसीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बाहेरचे लोक बोलल्यावर वैशाली यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत (Sourav Ganguly meet governor Jagdeep Dhankhar).