सरकारला प्रत्येक मशीद हिसकावून घ्यायची आहे’, ओवेसींनी केंद्र सरकारवर टीका
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी म्हटले की, सरकारला प्रत्येक मशीद त्यांच्याकडून हिसकावून घ्यायची आहे. यावेळी त्यांनी म्हटले की, ६ डिसेंबरबाबत कोणीच बोलायला तयार नाही.
नवी दिल्ली : लोकसभेत बोलताना AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी पुजारी-सम्राटासारखे काम करत आहेत. ते मुस्लिमांना दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला प्रत्येक मशीद त्यांच्याकडून हिसकावून घ्यायची आहे. 6 डिसेंबरबाबत बोलण्याची कोणाची हिंमत नाही. 22 जानेवारीचा पाया 6 डिसेंबर 1992 रोजीच घातला गेला होता, त्याचा पाया 1986 मध्ये कुलूप उघडून घातला गेला होता. जीबी पंत यांनी तो पाया घातला होता.
आजही मला संविधानावर विश्वास आहे. मेहरौलीची 600 वर्षे जुनी मशीद कोणतीही सूचना न देता पाडण्यात आली. केंद्र सरकारला प्रत्येक मशीद हिसकावून घ्यायची आहे. 17 कोटी मुस्लिमांना तुम्ही काय संदेश देत आहात हे केंद्राने सांगितले पाहिजे. असं ही ओवैसी म्हणाले.
तुम्ही जर प्रत्येक मशीद हिसकावून घेतली तर माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय उरणार. 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्यावर सरकार का बोलत नाही, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. तुम्ही 500 वर्षांची चर्चा करता. पण मी म्हणतो की देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. संविधानात समान अधिकार आहेत. पूर्वी राजे व संस्थाने होती. लोकशाही नव्हती.
एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून परराष्ट्र धोरण चालवतेय. मालदीव चीनच्या मांडीवर जाऊन बसलाय. चिनी सैन्य लडाखमध्ये येऊन मेंढपाळांना रोखत आहे. त्यामुळे सरकारचा बफर झोन कुठे गायब झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आम्ही सीएएच्या विरोधात आहोत कारण तुम्ही सीमांचलच्या मुस्लिमांना बांगलादेशी म्हणत आहात. त्याला कोणी घुसखोर किंवा रोहिंग्या म्हणतो.