Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर, दौऱ्यात कोणती मोठी घोषणा?
अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. पुण्यात ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करणार आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण हे त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुणे : केंद्रीय अमित शाह लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत, तसेच ते रविवारी पुण्यात असणार आहेत. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. पुण्यात ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करणार आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण हे त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
अमित शाह यांच्या दौऱ्याचं महत्व काय?
अमित शाह सहकार क्षेत्रासंदर्भात या परिषदेत काही महत्त्वाच्या घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराबाबत राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शाह यांचा हा दौरा आहे. अमित शाह देशाचे सहकारमंत्री झाल्यानंतर सहकार क्षेत्रात मोठे बदल होणार असल्याच्या चर्चा उठल्या होत्या आणि पुणे हे सहकार क्षेत्राचे हब मानले जाते, त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्याला विशेष महत्वा प्राप्त झाले आहे.
प्रवरा इथे देशातली पहिली सहकार परिषद
अमित शाह शिर्डीलाही भेट देणार आहेत, ते साईबाबाचे दर्शन घेणार आहेत. सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा इथं देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे तसंच विचारमंथनही होणार आहे. भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe) यांनी या सहकार परिषदेचं आयोजन केलंय. सहकार क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा आहेत.