ती चिमुरडी कोण? जिच्यासाठी महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विमानतळावर थांबले; का होतोय फोटो व्हायरल?
नवी दिल्लीत आजपासून जी-20 परिषद सुरू होत आहे. या परिषदेला जगभरातून दिग्गज नेते उपस्थित आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या वैश्विक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात होणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीसाठी जगभरातील नेत्यांचं दिल्लीत आगमन झालं आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत नाक्यानाक्यावर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. वाहनांची तपासणी केली जात आहे. तसेच शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच जगातील नेत्यांचं आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केलं जात होतं. पण या सर्व गदारोळात एक फोटो प्रचंड चर्चेत आला आहे. त्या फोटोवरून खमंग चर्चा रंगली आहे.
हा फोटो आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि एका 12 वर्षाच्या मुलीचा. दिल्ली विमानतळावर या मुलीशी महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चर्चा करताना दिसत आहे. हा फोटोची इतकी चर्चा झाली की त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांची मुलगी माया हिचा हा फोटो आहे. माया अवघी 12 वर्षाची आहे. तिने विमानतळावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं स्वागत केलं. यावेळी जो बायडन यांनी मायाशी हस्तांदोलन करत तिची विचारपूस केली. वाकून तिच्याशी संवाद साधला. आणि हाच फोटो व्हायरल झाल्याने मायाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तेव्हाही चर्चेत
माया यापूर्वीही अनेकदा चर्चेत आली आहे. तिचे वडील गार्सेटी यांनी भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून पद आणि गोपनीयतेची शबथ घेतली होती. त्यावेळीही मायाचा एक फोटो व्हायरल झाल होता. या फोटोत लहानग्या मायाच्या हातात हिब्रू बायबल होतं. याच बायबलला साक्ष ठेवून गार्सेटी यांनी पदाची शपथ घेतली होती.
प्रत्येक ठिकाणी मायाच माया
कोणत्याही मोठ्या प्रसंगात गार्सेटी आपल्या लेकीला सोबत नेत असतात. प्रत्येक बड्या कार्यक्रमाला माया त्यांच्यासोबत हजेरी लावत असते. माया जुआनिता गार्सेटी ही अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी आणि पत्नी एमी वेकलँड यांची एकुलती एक मुलगी आहे. अमेरिकेतील एखादी निवडणूक रॅली असो की वोटिंग बूथ असो. प्रत्येक ठिकाणी माया असतेच असते.
मोदी-बायडन भेट
दरम्यान, भारतात आल्यानंतर जो बायडन हे विमानतळावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान असलेल्या लोक कल्याण मार्गावर गेले. यावेळी मोदी आणि बायडन यांच्यात चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जी-20च्या मुद्दयावरून द्विपक्षीय चर्चा झाली. मोदी यांनी ट्विट करून या चर्चेची माहिती दिली.