Vijay Rupani Resign : गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री कोण? विजय रुपाणींच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय?
गुजरातमध्ये पुढील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विजय रुपाणी यांनी 7 ऑगस्ट 2016 रोजी गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
गांधीनगर : गुजरातमध्ये पुढील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री विजय रुपाणी (vijay rupani resign) यांच्या राजीनाम्याने गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विजय रुपाणी यांनी 7 ऑगस्ट 2016 रोजी गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पदही भूषवलं आहे. ते गुजरात विधानसभेत पश्चिम राजकोटचे प्रतिनिधित्व करतात.
नेमका राजीनामा का?
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले.
राजीनामा दिल्यानंतर, विजय रुपाणी यांनी त्याचं कारण सांगितलं. रुपाणी म्हणाले, मला गुजरातच्या विकास प्रवासात योगदान देण्याची संधी मिळाली. गुजरातचा विकास प्रवास नव्या उर्जेसह चालू राहिला पाहिजे, हे लक्षात घेऊन मी हे पद सोडत आहे. मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करतो.
नितीन पटेल मुख्यमंत्रिपदाचे दावेदार
रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. नितीन पटेल हे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विजय रुपाणी यांची कारकीर्द
विजय रुपाणींचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी रंगून, बर्मा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमणिकलाल आणि आईचे नाव मायाबेन. ते जैन धर्माचे अनुयायी होते. रमणिकलाल कुटुंब 1960 मध्ये बर्मा सोडून भारतात आले. मग ते राजकोट, गुजरात येथे राहू लागले. विजय रुपाणींनी धर्मेंद्रसिंह महाविद्यालयातून पदवी घेतली आणि नंतर सौराष्ट्र विद्यापीठातून एलएलबी केले.
कोण आहेत विजय रुपाणी?
- गुजरात रुपाणी यांनी गुजरताचं मुख्यमंत्रिपद भूषवलं, ते सध्या 65 वर्षांचे आहेत
- 7 ऑगस्ट 2016 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती
- ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात
- भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा म्हणून ते परिचीत होते.
- आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी वाहतूक, पाणीपुरवठा, कामगार तसेच रोजगार अशी मंत्रिपदं भूषवली
- गुजरातमध्ये अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम त्यांनी पाहिलं.
- रुपाणी हे 1996 मध्ये राजकोटचे महापौर होते त्यांनी 2006 ते 2012 या काळात राज्यसभा खासदार म्हणूनही काम पाहिलं
- नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा रुपाणी हे राज्य वित्त मंडळाचे अध्यक्ष होते
संबंधित बातम्या
Gujarat CM Resigns: गुजरातच्या राजकारणात भूकंप; मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा