तुम्ही चीटिंग केली, देवाने शिक्षा दिली…विनेश फोगाट काँग्रेसमध्ये जाताच बृजभूषण सिंहचा हल्ला
कुस्ती संघटनेचे अध्यक्ष असलेले सिंह बृजभूषण यांनी दावा केला, 'या कुस्तीपटूंनी कुस्तीच्या बळावर संपूर्ण देशात आपले नाव गाजवले होते. आता काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे नाव पुसले जाणार आहे. कुस्तीपटूंना न्याय देण्याच्या नावाखाली काँग्रेसचे अनेक नेते त्यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.
कुस्तीच्या आखाड्यात लढणारे पैलवान विनेश फोगाट आता राजकीय आखाड्यात उतरत आहेत. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. आता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात ते उतरणार आहे. 6 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान विनेश फोगाटने सलग 3 सामने खेळून 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्य पदक निश्चित केले होते. सुवर्णपदकाचा सामना 7 ऑगस्टच्या रात्री होणार होता, पण त्याच दिवशी सकाळी विनेशला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिचे पदकही गेले. आता भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांनी विनेशवर जोरदार हल्ला केला आहे. तू कुस्ती जिंकून गेली नाहीस, फसवणूक करून गेली होती, ज्युनियर खेळाडूंच्या हक्क मारुन गेली होती. त्यामुळे देवाने तुला तिथेच शिक्षा केली, असा हल्ला बृजभूषण सिंहने विनेशवर केला.
ही पथकथा काँग्रेसची
पैलवानांनी सुरु केलेल्या विरोध प्रदर्शनाचा संदर्भ घेत बृजभूषण सिंह म्हणाले, या प्रकरणाची कथा दोन वर्षांपासून सुरु झाली होती. 18 जानेवारीपासून कट कारस्थान सुरु झाले होते. त्यावेळी मी म्हटले होते, हे राजकीय षडयंत्र आहे. त्यात काँग्रेस सहभागी आहे. त्यात दीपेंद्र हुड्डा, भूपेंद्र हुड्डा यांची महत्वाची भूमिका आहे. त्यांनीच या कटाची कथा लिहिली होती. हे खेळाडूंचे आंदोलन नव्हते, हे आता दोन वर्षांनी समोर आले आहे.
एएनआयशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाला, मी मुलींचा अपराधी नाही, मुलींचा अपराधी कोणी असेल तर तो बजरंग आणि विनेश आहे. त्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टची जबाबदारी भूपेंद्र हुड्डा यांच्यावर आहे. सुमारे अडीच वर्षे त्यांनी कुस्तीचा उपक्रम जवळजवळ बंद केला.
विनेश फोगाटवर टीका करताना बृजभूषण म्हणाले, आशिया स्पर्धेत बजरंग विना ट्रायलने गेली होती. एक खेळाडू एका दिवसात दोन वजनात ट्रायल देऊ शकतो का?. काय वजन केल्यानंतर पाच तासापर्यंत कुस्ती थांबवता येते का? एका दिवसांत एक खेळाडू दोन कॅटेगरीत ट्रायल दिल्यावर इतरांच्या हक्कावर गदा येणार नाही का? काय रेल्वेतील रेफरीचा वापर केला गेला नाही? तू कुस्ती जिंकून गेली नव्हती तर चिटींग करुन गेली होती. ज्युनिअर खेळाडूंच्या हक्कांचे उल्लंघन करून तू गेली होती. त्यामुळे देवाने तुम्हाला शिक्षा केली आहे.
काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे नाव जाणार
कुस्ती संघटनेचे अध्यक्ष असलेले सिंह बृजभूषण यांनी दावा केला, ‘या कुस्तीपटूंनी कुस्तीच्या बळावर संपूर्ण देशात आपले नाव गाजवले होते. आता काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांचे नाव पुसले जाणार आहे. कुस्तीपटूंना न्याय देण्याच्या नावाखाली काँग्रेसचे अनेक नेते त्यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी एकामागून एक अनेक पैलवानांना आपले मोहरे बनवले.