राहुल गांधी यांच्या समर्थनात सगळे खासदार देणार राजीनामा? काँग्रेसची पुढची रणनीती काय?
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचं वातावरण आहे. काँग्रेसने तातडीने या प्रकरणातनंतर बैठक बोलवली असून महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचं संसदेतील सदस्यत्व पद रद्द करण्यात आलं आहे. यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर आज काँग्रेसची बैठक पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या बैठकीत एका खासदाराने सर्व खासदारांनी राजीनामे द्यावेत, असा प्रस्तावही ठेवला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, कर्नाटकच्या निवडणुकीत पूर्ण ताकद दाखवावी लागेल. कर्नाटकात पक्षाने निवडणूक जिंकली तर त्याचे उत्तर भाजपला आपोआप मिळेल. यादरम्यान त्यांनी पुढे काय करायचे यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे समितीच पाहणार आहे. मात्र, या बैठकीत राज्यांच्या विधानसभांमध्ये आंदोलन करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली आहे.
राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर या बैठकीत राजकीय रणनीतीवर चर्चा झाल्याचे जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सिंघवी यांनी या काळात काय कायदेशीर पावले उचलावीत याची माहिती सर्व नेत्यांना दिली आहे. जयराम रमेश पुढे म्हणाले की, भारत जोडो यात्रेने पक्षात नवा उत्साह संचारला आहे. आता या प्रकारच्या राजकारणावर काँग्रेस देशभरात कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करत आहे.
केंद्र सरकार कायदेशीर संस्थांवर दबाव आणत असल्याचा आरोप करत जयराम म्हणाले की, राहुल गांधींवर बुलेट ट्रेनपेक्षाही वेगाने कारवाई झाली. राहुल गांधींनी अदानीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी सरकारला घेरलं, काही दिवसांतच त्यांना शिक्षा झाली आणि सदस्यत्व रद्द झालं.
काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये एक वेगळी बैठक झाल्याची बातमी समोर येत आहे, या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी, अशोक गेहलोत, रणदीप सुरजेवाला आणि केसी वेणुगोपाल या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.