Women Reservation Bill 2023 : महिला आरक्षण विधेयक संसदेत, पण टाटाच्या ‘या’ कंपनीची का होतेय चर्चा?; आरक्षणाशी काय संबंध?
केंद्र सरकारने संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडलं आहे. त्यावर आज सात तास चर्चा होणार आहे. विधेयक मंजूर झाल्यास महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. एकीकडे महिला आरक्षणाची चर्चा सुरू झालेली असतानाच टाटाच्या एका कंपनीची चर्चा सुरू झाली आहे.
नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजुरीला ठेवलं आहे. महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्याचा त्यामुळे मार्ग मोकळा होणार आहे. परिणामी महिलांची संसदेतील संख्याही वाढणार आहे. अधिकाधिक महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवावा आणि स्त्री-पुरुषांमधील भेदाची दरी मिटवावी या हेतूने हे विधेयक संसदेत मांडण्यात आलं आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर होणार का? झालं तर ते याच निवडणुकांमध्ये लागू होईल का? असे सवाल या निमित्ताने विचारले जात आहेत. मात्र, संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडलं असलं तरी सध्या एका गोष्टीची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे टाटाच्या एका कंपनीची. टाटाच्या या कंपनीची अचानक चर्चा सुरू झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
टाटा ग्रुपची टीसीएस कंपनी ही देशातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक आहे. या कंपनीत 35 टक्के महिला स्टाफ आहे. या कंपनीत सुमारे दोन लाख महिला काम करत आहेत. देशातील कोणत्याही कंपनीपेक्षा टाटा कंपनीतील महिलांची ही संख्या सर्वाधिक आहे. या कंपनीकडून महिलांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. महिला आरक्षणापेक्षाही त्यांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत.
दोन लाख महिला कामावर
टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीत नोकरभरती दरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. त्यामुळेच या कंपनीत 2 लाख 10 हजार महिला आजमितीला कार्यरत आहेत. महिलांना नोकरीत प्राधान्य देणारी कंपनी म्हणून टीसीएसची ओळखच झाली आहे. या कंपनीत तब्बल 35 टक्के महिला स्टाफ आहे. एवढा स्टाफ कोणत्याही कंपनीत नाहीये.
महिलाच बॉस
टीसीएस कंपनीत सहा लाखाहून अधिक लोक काम करत आहेत. त्यात महिलांची टक्केवारी 35 टक्के आहे. 2023च्या आर्थिक वर्षात कंपनीने जेवढ्या लोकांना कामावर ठेवले त्यात महिलांची टक्केवारी 38.1 टक्का होती. याच आर्थिक वर्षात एक चतुर्थांश महिला या लीडरशीपच्या पोझिशनमध्ये होत्या. या कंपनीत महिलाच मोठ्या प्रमाणावर बॉस असल्याने त्या महिलांची काळजी घेत असतात.
कंपनीतील सुविधा काय?
महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्राधान्य
प्रमोशन आणि हायरिंगमध्ये महिला उमेदवारांना प्राधान्य
नाईट शिफ्टमध्ये महिलांना जेवण आणि कॅबची सुविधा दिली जाते
आरोग्य विमा, प्रसूती रजा आणि महिलांच्या सुरक्षेवरही अधिक भर दिला जातो
कंपनीत दोन लाखाहून अधिक म्हणजे कंपनीतील एकूण स्टाफच्या 35 टक्के महिला कार्यरत आहेत
या कंपनीतही महिलांची सर्वाधिक संख्या
टाटाच्या टीसीएसशिवाय इन्फोसिस, विप्रो, एचसीएलसहीत इनविअर बनवणारी कंपनी पेज इंडस्ट्रीजमध्येही महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. इन्फोसिसमध्ये 1,24,498 महिला कर्मचारी आहेत. तर विप्रोमध्ये महिलांची संख्या 88,946 आहे. HCL मध्ये 62,780 तर पेज इंडस्ट्रीजमध्ये 74% महिला कर्मचारी आहे. म्हणजे पेज इंडस्ट्रीजमध्ये 22,631 महिला कर्मचारी कार्यरत आहेत.