सावळा नवरदेव पाहून नवरी म्हणाली, ह्यो नवरा नकोच, वरमाला टाकण्यास नकार; पुढे काय झालं?
उत्तर प्रदेशातील एका लग्नात धक्कादायक प्रकार घडला. वरमाला टाकण्याची वेळ येताच नवरीने लग्नातच लग्नाला नकार दिला. नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकण्यास नकार दिल्याने एकच खळबळ माजली.
लखनऊ : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका नवरीने वरात दारात आलेली असतानाच लग्न करण्यास नकार दिला आहे. होणारा नवरा सावळा असल्याने त्याच्याशी लग्न करण्यास तिने नकार दिला. विशेषण म्हणजे नवरी मंडपात आली. हार घेऊन स्टेजवर आली. मात्र, स्टेजवर तिने नवरदेवाला पाहताच तिचं मन बदललं आणि तिने लग्न करण्यास नकार दिला.
नटूनथटून आलेल्या नवरीने स्टेजवर आल्यावर लग्नाला नकार दिल्याने वऱ्हाडी मंडळींनाही धक्का बसला. लग्न करण्यास नकार का देत आहेस? असं नवरीला विचारण्यात आलं. त्यावर नवरदेव सावळ्या रंगाचा असल्याचं तिने सांगितलं. मला सावळ्या रंगाचा नवरा नको. तसेच नवरदेव माझ्यापेक्षा अधिक वयाचा आहे. थोराड नवराही मला नकोय, असं तिने सांगितलं. नवरीचं हे म्हणणं ऐकूनवरदेवाचे नातेवाईक लालेलाल झाले. त्यांनी प्रचंड आकांडतांडव केलं. नवरीच्या आईवडिलांशी हुज्जत घालत त्यांच्यावर किंचाळले. त्यामुळे नवरीकडचे लोकही भडकले आणि तेही नवरदेवाच्या नातेवाईकांना भांडू लागले. त्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. संपूर्ण लग्नात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
सर्वांनीच समजावले
त्याचवेळी अनेकांनी नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. आई, वडील, बहीण, नातेवाईक आणि मैत्रीणींनी तिला प्रचंड समजावले. नवरदेवाच्या नातेवाईकांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण नवरी काही ऐकायला तयार नव्हती. अखेर नवरदेवाला नवरीशिवाय आपली वरात परत न्यावी लागली.
नवरदेवालाही धक्का
29 मे रोजी ही घटना घडली. पिपरी पोलीस ठाणे क्षेत्रातील शेरपूरमध्ये राहणाऱ्या तरुणाचे लग्न चरवा पोलीस ठाणे परिसरातील एका गावातील तरुणीशी विवाह ठरला होता. 29 मे रोजी नवरदेव वरात घेऊन लग्न मंडपात गेला. नवरीच्या घरच्यांनी नवरदेवाचं स्वागत केलं. त्यानंतर नवरदेव स्टेजवर आला आणि मुख्य लग्न सोहळ्याला सुरुवात होणारच होती. तोच नवरीने नवरदेव सावळा असल्याचं सांगत लग्न न करण्याचा हट्टच धरला. त्यामुळे एकच गोधळ निर्माण झाला. वऱ्हाडी मंडळींनाही धक्का बसला. होणाऱ्या पत्नीने लग्नातच लग्नाला नकार दिल्याने नवरदेवलाही धक्का बसला. मुलीच्या या निर्णयाने तिचे आईवडील आणि घरातील मंडळीही घाबरून गेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिची समजूत काढली जात होती.
पंचायत येऊनही उपयोग नाही
नवरी ऐकत नसल्याने अखेर पंचायत बोलावली. पंचायतीनेही नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला. तिने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकावी म्हणून अनेक प्रयत्न केले गेले. पण नवरी तिच्या निर्णयावर अडून बसली. त्यामुळे पंचायतीनेही तिच्यासमोर हात टेकले. अखेर नवरी शिवाय वरात पुन्हा गेली. मुलीच्या या भूमिकेने नवरीच्या घरचेही हिरमसून गेले होते.