कोरोनाचा कहर वाढला, पुन्हा लॉकडाऊन लागणार? मंत्री, मुख्यमंत्री काय म्हणाले? वाचा सविस्तर
मंत्री नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कडक निर्बंधांवर बोट ठेवलंय. सध्या वाढती रुग्ण संख्या पाहता, महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचा सूर हा कडक निर्बंधांचा आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता, सध्या लॉकडाऊनवरुन चर्चा रंगलीय. त्यात सरकारचे काही मंत्री थेटपणे लॉकडाऊनचे संकेत देत आहेत. मुख्यमंत्री कोरोनावर लवकरच बोलणार असं म्हणतायत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही पण निर्बंध वाढवले जातील, असं स्पष्टपणे म्हटलंय. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक सध्या हेच विचारतोय की, लॉकडाऊन लागणार का ?
मंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेत
मंत्री नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कडक निर्बंधांवर बोट ठेवलंय. सध्या वाढती रुग्ण संख्या पाहता, महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांचा सूर हा कडक निर्बंधांचा आहे. तर काही दिवसांत कोरोनावर बोलेण, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलंय. आरोग्य मंत्र्यांनी मात्र सध्या सरकारच्या बैठकांमध्ये लॉकडाऊनची चर्चा नसल्याचं म्हटलंय.
कोरोना वाढतोय, राजकारण सुरू
एकीकडे महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढतेय. तर दुसरीकडे राजकारणही सुरु झालंय. पंतप्रधान मोदी मास्क लावा असं सांगतात, पण भाजपचे नेतेच मास्क लावत नाहीत, भाजपच्या नेत्यांमुळं तिसरी लाट येणार अशी टीका मंत्री मलिकांनी केलीय. संजय राऊतांनी तर अजबच तर्क सांगितलाय. मोदी मास्क लावत नाहीत म्हणून मीही मास्क लावत नाही, असा राऊतांचं म्हणणंय. महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते भाजपवर टीका करतायत. मात्र खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपेंनाच मास्कचा विसर पडला. औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात नियमांचा फज्जा उडाला…काही मोजके सोडले तर कार्यकर्त्यांच्याही तोंडावर मास्क नव्हताच. अखेर माध्यमांचे कॅमेरे दिसताच, राजेश टोपेंनी मास्क लावला.