Sambhaji Chhatrapati: डेडलाईन संपली, संभाजी छत्रपती ‘वर्षा’कडे फिरकलेच नाही; आता अपक्ष म्हणून लढणार की माघार?
Sambhaji Chhatrapati: राज्यसभेच्या निवडणुकीत पाठिंबा मिळावा म्हणून संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती.
मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना शिवसेनेचा (shivsena) पाठिंबा मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी संभाजी छत्रपती यांना आज दुपारी 12 वाजता वर्षा निवासस्थानी बोलावलं होतं. वर्षावर या शिवबंधन बांधा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी संभाजी छत्रपती यांना दिला होता. मात्र, 12 वाजून गेले तरी संभाजी छत्रपती वर्षा निवासस्थानी आले नाहीत. त्यामुळे संभाजी छत्रपती यांनी शिवसेनेचा पाठिंबा घेण्याचा नाद सोडून दिल्याचं सांगितलं जातं. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आता संभाजी छत्रपती काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाजी छत्रपती अपक्ष म्हणून लढणार की निवडणुकीतूनच माघार घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजे याबाबत लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
भेटीगाठी आणि ऑफर
राज्यसभेच्या निवडणुकीत पाठिंबा मिळावा म्हणून संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अपक्ष राहण्यापेक्षा शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहा. आम्ही तुम्हाला निवडून आणतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे संभाजीराजेंना शिवसेना उमेदवार घोषित करण्यापेक्षा आघाडीचा उमेदवार घोषित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचं समजतं. मात्र, शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी काल संभाजीराजेंची हॉटेलमध्ये भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी उद्या दुपारी 12 वाजता वर्षावर शिवबंधन बांधण्यासाठी या, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना दिल्याची बातमी धडकली. तर अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केल्याचंही वृत्त आलं. त्यामुळे संभाजीराजेंच्या मार्गातील अडसर अधिकच वाढला.
डेडलाईन टळली, पुढे काय?
मुख्यमंत्र्यांच्या निरोपानुसार संभाजी छत्रपती संभाजी राजे वर्षावर येतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मीडियाचे कॅमेरेही वर्षा निवासस्थानी तैनात झाले होते. वर्षावर जाणाऱ्या प्रत्येक वाहनांकडे लक्ष दिलं जात होतं. मात्र, 12 वाजून गेले तरी संभाजीराजे वर्षावर फिरकलेच नाही. त्यांच्याकडून कोणताही निरोप आला नाही. त्यामुळे आता संभाजीराजे अपक्ष म्हणून लढणार की माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गणित काय?
सध्या शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. इतर पक्षांचे 8 आणि अपक्ष 8 मिळून महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या 169 होते. तर भाजपकडे 113 आमदार आहेत. त्यात भाजपचे 106 आमदार, रासप, जनसुराज्य पक्षाचा प्रत्येकी 1 आणि अपक्ष 5 आमदार आहेत. संख्याबळानुसार महाविकास आघाडी आपले तिन्ही उमेदवार निवडून आणू शकते. तर उरलेली 27 मते आणि इतर अधिक अपक्षांची 16 मते मिळून चौथा खासदारही महाविकास आघाडी निवडून आणू शकते. या शिल्लक मतात शिवसेनेची मते सर्वाधिक आहेत.
दुसरीकडे भाजप संख्याबळानुसार दोन जागा सहज निवडून आणू शकते. दोन उमेदवार निवडून आणल्यानंतर भाजपकडे 22 मते शिल्लक राहतात. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर पक्ष आणि अपक्ष आमदारांची 7 मते अशी एकूण 29 मते शिल्लक राहतात. त्यामुळे भाजप तिसरा उमेदवार देण्याची खेळी करू शकते. मात्र, भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येणं कठिण आहे.