अजित पवार, नारायण राणे पुन्हा आमने-सामने; सरकार पडणार म्हणाऱ्यांमध्ये राणेंची भर, पवारांनी लगावला टोला
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरून राणे आणि अजित पवारांमध्ये सुरु झालेली शाब्दिक चकमक काही थांबताना दिसत नाहीये. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवताच, राणेंनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं होतं. आता भाजपाचा मुख्यमंत्री असेल असे राणे यांनी म्हटले होते. यावर अजित पवारांनी आता राणेंना आपल्या खास शैलीमध्ये उत्तर दिले आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत, महाविकास आघाडीच्या पॅनलचा पराभव करताच, राणेंनी थेट राज्य सरकारलाच आव्हान दिलं होतं. महाविकास आघाडीला लगानची टीम म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसवणार, अशा शब्दात राणेंनी सरकारला डिवचलं होतं. मात्र आता राणेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. सरकार पडेल हे सांगणाऱ्यांमध्ये राणेंची नवी भर पडली आहे. अशा खोचक शद्बांमध्ये पवारांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
यापूर्वी आले आमने-सामने
दरम्यान अजित पवार आणि नारायण राणे आमने-सामने येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वी देखील अनेकदा पवार आणि राणे यांचा सामना झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निमित्तानं मतदाना आधीही अजित पवार आणि राणे आमनेसामने आले होते. बँका उभ्या करायला अक्कल लागते, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बोलताना राणेंनी अक्कल असणाऱ्यांकडेच जिल्हा बँक आली, असा पलटवार राणेंनी केला होता.
सामनातून नारायण राणेंवर निशाणा
राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयाचा सामनामधून देखील समाचार घेण्यात आला होता. राणे यांनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरु झाली. भारतीय जनता पक्षाला वरातीत नाचायला आणि दु:खात रडायला भाडोत्री लोक लागतात. असे लोक मिळाले की ते आनंदाने बेहोश होतात. सिंधुदुर्गात तेच घडले. कोकणात आजही लोक भुताखेतांच्या गोष्टीत रमतात, पण त्या अनेकदा भाकडकथाच असतात. एका जिल्हा बँकेवर विजय मिळवताच राज्यात सत्ता परिवर्तन होईल, अशी बोंब मारणे यास भाकडकथा नाही म्हणायचे तर दुसरे काय ? असा सवाल सामनामधून उपस्थित करण्यात आला होता.