शरद पवारांच्या बैठकीनंतरही एसटी संपावर तोडगा नाहीच; कर्मचाऱ्यांचे आता राणेंना साकडे
एसटीच्या संपाला दोन महिन्यांहून अधिकचा काळ झालाय. शरद पवारांनी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची बैठक घेऊन संप मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत. तर ग्रामीण भागात नागरिकांचे मेगाहाल सुरूच आहेत. दुप्पट तिकीट देऊनही जीव धोक्यात घालून लोकांचा प्रवास सुरू आहे.
मुंबई : एसटीच्या संपाला (ST strike) दोन महिन्यांहून अधिकचा काळ झालाय. शरद पवारांनी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची बैठक घेऊन संप मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत. तर ग्रामीण भागात नागरिकांचे मेगाहाल सुरूच आहेत. दुप्पट तिकीट देऊनही जीव धोक्यात घालून लोकांचा प्रवास सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्यानं, लालपरी डेपोतच आहे. त्यामुळं राज्यभरातील प्रवाशांना खासगी बसेस आणि वडापमधून प्रवास करावा लागतोय. अशा वाहनांमध्ये एक तर बसायला नीट जागा नसते तसेच तिकीटाचे दर देखील दुप्पट आकारले जातात. मात्र अनेक नागरिकांना प्रवास केल्याशिवाय गत्यंतर नसते. अनेक वेळा महत्त्वाच्या कामासाठी प्रवास हा करावाच लागतो. राज्य परिवहन महामंडळाच्या बस बंद असल्याने खासगी वाहन व्यवसायिकांकडून प्रवाशांची सर्रास लूट सुरू आहे. बस सेवा केव्हा सुरू होणार असा प्रश्न आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक
एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मागण्या मान्य होतील असा शब्द देऊन पवारांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं. मात्र 10 तारखेच्या आवाहनानंतरही, 11 तारखेला म्हणजेच मंगळवारी फक्त 356 कर्मचारीच कामावर आले. मंगळवारपर्यंत एकूण ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 25 हजार 631 इतकी आहे. म्हणजेच तब्बल 66 हजार 635 कर्मचारी संपावर आहेत. विशेष म्हणजे जे कर्मचारी कामावर आलेत. त्यात ऑफिस स्टाफचा आणि मेकॅनिकचा समावेश अधिक आहे. ड्रायव्हर आणि कंडक्टर फार कमी कामावर आहेत. 7 हजार 481 ड्रायव्हर आणि कंडक्टरच कामावर आहेत. तर 51 हजार 201 कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. 53 आगार हे शंभर टक्के बंद आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचे नारायण राणेंना साकडे
दुसरीकडे सिंधुदुर्गात संपकरी कर्मचाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली. विलीनीकरणाच्या मागणीबाबत आपणही आवाज उठवावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी राणेंना केलीये. एसटीच्या संपाला जवळपास 68 दिवस झालेत. समितीचा अहवाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल. त्यामुळं पुढचे आणखी 20 दिवस तरी सर्वसामान्य जनतेचे मेगाहालच आहेत.
संबंधित बातम्या
कोरोना निर्बंध : शाळा, महाविद्यालय, पर्यटनस्थळी कोरोना वाढतो! मग बाजारपेठांमध्ये कोरोना मरतो का?