PHOTO : छळ करणाऱ्या वडिलांची चाकूने भोसकून हत्या, मुलींच्या समर्थनार्थ संपूर्ण रशिया मैदानात, तीन बहिणींची भयावह कहानी
रशियात एका फ्लॅटमध्ये तीन बहिणी आपल्या वडिलांसोबत एकत्र राहत होत्या. मात्र, एका रात्री तीनही बहिणींनी आपल्या वडिलांची हत्या केली (Khachaturyan sisters killed father in Russia).
Follow us
रशियात एका फ्लॅटमध्ये तीन बहिणी आपल्या वडिलांसोबत एकत्र राहत होत्या. मात्र, एका रात्री तीनही बहिणींनी आपल्या वडिलांची हत्या केली. हत्येनंतर मुलींनी तातडीने पोलिसांना फोन करत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेचा रशियाच्या सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठा परिणाम झाला. या घटनेवरुन रशियात प्रचंड गदारोळही झाला. या गदारोळामागील कारण नेमकं काय आहे, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
रशियात 27 जुलै 2018 रोजी तीन मुलींनी आपल्या वडिलांची निघृणपणे हत्या केली. हत्येच्या वेळी मुलींची आई त्यांच्यासोबत नव्हती. हत्येनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या मुलींच्या वडिलांच्या मृतदेहावर तब्बल 30 ठिकाणी जखमा होत्या. दरम्यान, पोलिसांनी हत्येमागील कारण विचारलं तेव्हा वडिलांच्या छळाला वैतागून अशाप्रकारचं पाऊल उचलल्याचा कबूली जबाब मुलींनी दिला.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, संबंधित व्यक्ती मुलींचा छळ करत असे. त्यांना प्रचंड मारहाण करत असे. घरात डांबून ठेवत असे. त्याचबरोबर मुलींचं लैंगिक शोषण देखील झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
या मुलींची नाव मारिया खचातुर्यन, अँजेलिना खचातुर्यन आणि क्रिस्टिना खचातुर्यन असं आहे. ज्यावेळी त्यांनी वडिलांची हत्या केली त्यावेळी त्या तीनही बहिणी अल्पवयीन होत्या. या मुलींच्या वडिलांनी त्यांच्या आईचादेखील छळ केला होता. त्यामुळे आई घर सोडून निघून गेली होती. मुलींनी जेव्हा वडिलांची हत्या केली तेव्हा ते मॉस्को शहरात एकास फ्लॅटमध्ये राहायचे.
या प्रकरणी मुलींनी वडिलांविषयी केलेल्या तक्रारींबाबत पुरावा सापडला असला तरी त्यांच्यावर हत्येचा आरोप लावण्यात आला होता. त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण प्रचंड तापलं. रशियातील तब्बल तीन लाख नागरिक मुलींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. त्यांनी मुलींच्या सूटकेची मागणी केली होती. मानवधिकार संघटनांनी मुलींना गुन्हेगार ऐवजी पीडित म्हटलं होतं. त्याचबरोबर याबाबतच्या कायद्यात बदल करण्याची मागणी केली होती.
या प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. मात्र, ही सुनावणी अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. विशेष म्हणजे यावर्षी सुनावणी स्थगित करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी तीनही बहिणींची जामीनावर सूटका करण्यात आली, मात्र त्यांच्यावर काही बंधनं लादण्यात आले आहेत. यामध्ये पत्रकारांशी संवाद न करणं याचादेखील समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणी मुली दोषी सिद्ध झाल्यास त्यांना 20 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.