Marathi News Photo gallery Seven years old alibaug girl Sharvika Mhatre climbs 100 forts in maharashtra state
अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीने सर केले राज्यातील 100 गड-किल्ले
अलिबागच्या सात वर्षांच्या शर्विका म्हात्रेनं आपल्या नावे अनोखा विक्रम केला आहे. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तिने राज्यातील 100 गड-किल्ले सर केले आहेत. या चिमुकलीचा हा प्रवास थक्क करणारा आहे. या विविध गड-किल्ल्यांवरची मातीसुद्धा तिने गोळा केली आहे.
Sharvika Mhatre Image Credit source: Instagram
Follow us
अवघ्या सात वर्षांच्या अलिबागच्या शर्विका म्हात्रे या चिमुकलीच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद आहे. हे शतक कुठल्याही खेळातलं किंवा क्रिकेटमधील नाही. तर शर्विकाने इतक्या लहान वयात राज्यातील तब्बल 100 गड-किल्ले सर केले आहेत.
अडीच वर्षांची असताना शर्विकाने सर्वांत आधी रायगड सर केला होता. त्यानंतर आता नुकतंच तिने अवघ्या तीन तासांत 3000 फुटांवर ट्रेक करत पुण्यातील जीवधन किल्ला सर केला आहे. हा तिचा शंभरावा किल्ला ठरला आहे. या प्रत्येक गड-किल्ल्यावरील माती तिने गोळा केली आहे.
शर्विकाचे आईवडील शिक्षक असून तिच्या या अभूतपूर्व कामगिरीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
शंभरावा किल्ला सर करताना शर्विकासोबत आणखी 50 ट्रेकर्स सहभागी झाले होते. पनवेलमधल्या सर्वांत उंच (90 अंश) कलावंतीण किल्ला सर करणारी शर्विका ही राज्यातील सर्वांत लहान मुलगी ठरली आहे. प्रत्येक गड-किल्ल्यावरून आणलेली माती तिने तिच्या घरी जपून ठेवली आहे.
“शर्विकाचा हा प्रवास अत्यंत नैसर्गिकरित्या सुरू झाला आहे. यासाठी तिने कोणतीच शारीरिक प्रशिक्षण घेतलेलं नाही. शर्विकाने गोळा केलेली माती हा ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या मोहिमेचा एक भाग बनणार आहे. पुढच्या वर्षी आम्ही तिला भिंत चढण्याचं प्रशिक्षण देऊ”, अशी प्रतिक्रिया तिचे वडील जितेन यांनी एका मुलाखतीत दिली आहे.