10 आमदार माझ्या संपर्कात, खडसेंचा दावा; भाजपमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार?
माझ्यासोबत उद्या भाजपचे 15-16 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भाजपमधील 10-12 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
जळगाव: माझ्यासोबत उद्या भाजपचे 15-16 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भाजपमधील 10-12 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ‘टीव्ही9 मराठी’शी खास बातचीत करताना खडसे यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (10 bjp mla wanted to join ncp says eknath khadse)
भाजपचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच टीव्ही9 मराठीला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हा दावा केला. माझ्या संपर्कात भाजपचे 10-12 आमदार आहेत. पक्षांतर बंदी कारणामुळे आमदार तूर्तास सोबत येणार नाही. निवडणुकाही त्यांना परवडणार नाहीत. पण भाजपचे 10-12 माजी आमदारही माझ्या संपर्कात असून त्यापैकी दोन-चार माजी आमदार उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. नगराध्यक्ष आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकारी उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असंही खडसे यांनी सांगितलं.
पाटील वगळता कुणीही संपर्क साधला नाही
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वगळता माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही. तेही एका कार्यकर्त्याने सांगितलं म्हणून पाटलांनी संपर्क साधला. त्यामुळे पक्षात राहण्यासाठी माझी मनधरणी करण्यात आली यात काही तथ्य नाही, असंही ते म्हणाले.
त्या पादुका परत मागणार
नाथाभाऊंच्या पादुका घेऊनच मी काम करत आहे, असं चंद्रकांत पाटील सांगत असतात. त्यांनी या पादुका मला अजून दिलेल्या नाहीत. त्यांच्याकडून या पादुका मी परत घेणार आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
दहा – बारा जणांवर गुन्हे, मग माझ्यावरच अन्याय का?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दहा-बारा जणांवर गुन्हे होते. एका मंत्र्याचं प्रकरण तर सीबीआयकडे होतं. तरीही सर्वांना क्लिन चीट मिळाली. मग माझ्यावरच अन्याय का?, असा सवाल करतानाच मला क्लिन चीट द्यावी असं माझं म्हणणं नाही. पण माझा दोष काय? हे तरी मला सांगायला हवं ना. त्याचं उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
LIVE : अजित पवारांसोबत पाच वाजता शपथ घेता ही नैतिकता आणि मी राष्ट्रवादी गेलो तर ही अनैतिकता – एकनाथ खडसे https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/1j5ltySBuX
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2020
संबंधित बातम्या:
Live Update : 10 आमदार माझ्या संपर्कात, खडसेंचा दावा; भाजपमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार?
‘खडसे सिर्फ झांकी है, बहुत कुछ बाकी है’; मुश्रीफ यांचा सूचक इशारा