Maharashtra Cabinet Expansion : भाजपला महिला मंत्र्यांचे वावडे आहे काय? राठोडांची हकालपट्टी करा; आपची मागणी
Maharashtra Cabinet Expansion : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात कोणताही आरोप नसलेल्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाईल असे भाजपाकडून सांगितले जात होते. पण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर वेगळेच चित्र समोर आले.
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या विस्तारात (Cabinet Expansion) महिलांना स्थान न देण्यात आल्याने आम आदमी पार्टीनेही संताप व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारात 18 मंत्र्यांना शपथ दिली गेली पण त्यात एकाही महिला आमदाराचा समावेश आहे. शिंदे – फडणवीसांचं पुरुषप्रधान मंत्रिमंडळ आहे का? भाजपला महिला मंत्र्यांचे वावडे आहे का? एकीकडे महिलांना मंत्रिमंडळात स्थान नाही पण दुसरीकडे, पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असलेल्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिले आहे. महिलांना स्थान नाही आणि महिला अत्याचारींना मानाचे स्थान ही बाब अत्यंत निंदनीय आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, अशी टीका आम आदमी पक्षाच्या (aap) मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन (priti sharma menon) यांनी केली आहे. तसेच संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रीती शर्मा मेनन यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर 40 दिवसानंतर राजभवनात पार पडला. पहिल्या टप्प्यातील या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 18 मंत्र्यांना शपथ दिली गेली. मात्र, या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश नसल्याने आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
सबका साथ, सबका विकास कुठे आहे?
ईडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर पार पडला. उशिरा का होईना राज्याला मंत्री मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण देशाच्या प्रगतीसाठी महिला सक्षमीकरण महत्वाचे आहे असे कायम सांगत असलेल्या भाजपाला मंत्रिमंडळाचा विस्तार करताना महिलांचा विसर पडलेला आहे. भाजप सबका साथ, सबका विकास म्हणतो पण ठराविक वर्गाचेच कल्याण करतो. आताही महिला सक्षमीकरणाच्या बाता मारणाऱ्या भाजपला मंत्रिमंडळात घेण्यासाठी एकही लायक महिला आमदार दिसली नाही, अशी टीका त्यांनी केली.
राठोडांची हकालपट्टी करा
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात कोणताही आरोप नसलेल्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाईल असे भाजपाकडून सांगितले जात होते. पण मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर वेगळेच चित्र समोर आले. एकीकडे महिलांना संधी नाही पण दुसरीकडे पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणे आणि त्याचे समर्थन करणे हे अत्यंत दुदैवी आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी होताना आमदारांचे चारित्र न बघता पैसे घेऊन मंत्रिपदाची खिरापत दिली का? असा सवाल करतानाच संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.