Abdul Sattar : पंगतीला बसले अन् बुंदीच संपली, सत्तारांची अवस्थाही अशीच होणार?; टीईटी घोटाळ्यामुळे सत्तारांचा मंत्रिपदाचा पत्ता कट होणार?
Abdul Sattar : पण उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या आधीच टीईटी घोटाळा बाहेर आला असून त्यामुळे सत्तार घेरले गेले आहेत. टीईटी परीक्षेत गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहेत. त्यात सत्तार यांच्या चार मुलांची नावे आहेत.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे विधान परिषदेवर निवडून आले. त्यामुळे त्यांच्याकडे राज्याचं गृहखातं जाणार असल्याची चर्चा होती. पण विधान परिषदेची निवडणूक होताच एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत (shivsena) मोठी फूट पडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे पंगतीला बसले अन् बुंदीच संपली अशी खडसेंची अवस्था झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. खडसेंची जशी अवस्था झाली तशीच अवस्था काहीशी शिंदे गटाचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार (abdul sattar) यांची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तार यांनीही शिवसेनेविरोधात बंड केलं. बंड करून ते मंत्रिपद सोडून शिंदे गटात आले. त्यामुळे सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती. पण उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार असतानाच टीईटी घोटाळ्यावरून सत्तार घेरले गेले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारातून (Maharashtra Cabinet Expansion) सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंगतीला बसले अन् बुंदीच संपली अशी अवस्था सत्तार यांची होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्तारात एकूण 12 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. या 12 जणांची नावे ठरली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नंदनवन या निवासस्थानी तब्बल दोन तास बैठक झाली. यात ही नावे फिक्स करण्यात आली. शिंदे गटासोबत आलेल्या माजी मंत्र्यांनाच सुरुवातीला शपथ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे मागील खातीच ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातं. तर भाजपकडूनही स्वच्छ चारित्र्याच्या आणि विधानसभेतील आमदारांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
सत्तारांचा पत्ता कट होणार?
दरम्यान, आपल्या मंत्रिपदाला सोडून अब्दुल सत्तारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. सत्तार यांनी शिंदे यांना पदोपदी साथ दिली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पहिली जाहीर सभा त्यांनी सिल्लोडमध्ये घेतली. तसेच शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना शिवसेनेत आणण्यात सत्तार यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. या पार्श्वभूमीवर सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळेल असं सांगितलं जात होतं.
पण उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या आधीच टीईटी घोटाळा बाहेर आला असून त्यामुळे सत्तार घेरले गेले आहेत. टीईटी परीक्षेत गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहेत. त्यात सत्तार यांच्या चार मुलांची नावे आहेत. सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचं प्रमाणपत्रंही रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे सत्तार अडचणीत सापडले आहेत. पहिल्याच अधिवेशनात टीईटी घोटाळा गाजणार असल्याने सुरुवातीलाच नख लागू नये म्हणून सत्तार यांना पहिल्या विस्तारातून वगळण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.