Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही, सामनातून हल्लाबोल
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना सुद्धा या आमदारांना मतदानात भाग घेऊ दिला गेला जे बेकायदेशीर होतं.
मुंबई: शिंदे गटातील (Shinde Group) आमदार कडक सुरक्षेसह गोव्यातून मुंबईत आले. अगदी कुलाब्याच्या त्यांच्या हॉटेलपर्यंत त्यांना केंद्राकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. इतकी कडक सुरक्षा कधीच कुणासाठी नव्हती असंही काल शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. आज याच बाबतीत शिवसेनेच्या सामना (Samana Shivsena) मधून घणाघात करण्यात आलेले आहेत. जेव्हापासून उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे तेव्हापासून महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना सुद्धा या आमदारांना मतदानात भाग घेऊ दिला गेला जे बेकायदेशीर होतं. कसाबच्या सुरक्षेसाठी देखील इतका पोलीस बंदोबस्त नव्हता जितका या शिंदे गटातील आमदारांसाठी कडक बंदोबस्त होता शिवाय हवाई दल आणि सैन्यच तेवढं वापरायचं बाकी होतं असंही सामनात म्हटलंय.
महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना या आमदारांना मतदानात भाग घेऊ देणे बेकायदेशीर आहे, पण उद्भव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा मोठा प्रवास करून शिंदे गटाचे आमदार मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळापासून कुलाब्यातील त्यांच्या हॉटेलपर्यंत सुरक्षेसाठी हजारो केंद्रीय जवान दुतर्फा बंदुका घेऊन उभे होते. फक्त हवाई दल आणि सैन्यच वापरायचे काय ते बाकी होते. कसाबच्या सुरक्षेसाठी सुद्धा इतके पोलीस नव्हते, पण महाराष्ट्र हा शहीद स्वाभिमानी तुकाराम ओंबाळेंचा आहे, हे शिंदे गटाच्या आमदारांनी विसरू नये.
कशासाठी एवढा बंदोबस्त? आदित्य ठाकरेंचा सवाल
विधानभवन परिसरातील सुरक्षेवरून शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली. सरकार तुमचं आहे. पोलीस तुमच्या हातात आहे. तरीही तुम्हाला भीती एवढी कशाची आहे? कसाबला पकडलं तेव्हा त्यालाही एढी सुरक्षा दिलेली नव्हती. एवढी सुरक्षा बंडखोरांना द्यायला भीती कशाची आहे? मला वाईट एवढंच वाटतं की त्यांना बसमधून आणलं गेलं. मला वाटत नाही की कधीही असं कोणत्याही अतिरेक्यांना एवढा बंदोबस्त लावून आणलं असेल. कसाबलाही आणलं नसेल. कशासाठी एवढा बंदोबस्त? कोण पळणार आहे की कोण काय करणार आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सरकारचा एवढा बंदोबस्त असताना आणि विधानभवनाच्या परिसरात एवढा कडेकोट बंदोबस्त असताना एवढा बंदोबस्त का? कसाबच्या वेळीही मुंबईत एवढा बंदोबस्त पाहिला नव्हता, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.