उत्तर प्रदेशातील हल्ल्यानंतर ओवैसींना केंद्र सरकारकडून Z+ सुरक्षा, 36 सुरक्षारक्षक ताफ्याच्या तैनातीत!
उत्तर प्रदेशातील या हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी निवडणुक आयोगाकडे जाणार असल्याचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगेलच तापले असताना गुरुवारी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asduddin Owaisi) यांच्यावर गाडीवर गोळीबार झाला. हापूर जिल्ह्यात प्रचारसभेहून परतत असताना त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला झाला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील राजकारण मात्र आणखीच तापले. आता केंद्र सरकारच्या वतीने असदुद्दीन ओवैसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. नुकतीच याबाबत घोषणा करण्यात आली. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची (CRPF) झेड प्लस सुरक्षा असदुद्दीन ओवैसी यांना संपूर्ण देशभरात दिली जाईल, असे गृह मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
गुरुवारी ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार
असदुद्दीन ओवैसी हे उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारावर आहेत. दरम्यान, गुरुवारी हापूर जिल्ह्यातून दिल्लीकडे जाताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. नॅशनल हायवे 24 च्या हापूर-गाझियाबाद फाट्यावरील छिजारसी टोल प्लाझाजवळ संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे ओवैसी यांनी सांगितले. AIMIM चे खासदार ओवैसी यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. ट्वीटमध्ये ते म्हणाले, काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार झाला. या हल्ल्यात चार गोळ्या झाडल्या. ते 3-4 लोक होते. सगळेच पळाले असून शस्त्र त्यांनी जागेवरच सोडली. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तेथून निघालो. मी सध्या सुरक्षित आहे.’
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, ओवैसी यांच्यावरील हल्ल्याचे गांभीर्य ओळखून उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटकेनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. हापूरचे एसपी दीपक भूकर यांनी सांगितले की, ओवैसी यांच्या सातत्याने होणाऱ्या वक्तव्यानंतर आमच्या मनात संताप होता. त्यामुळेच आम्ही त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्याचे पाऊल उचलले, अशी कबूली आरोपींनी दिली. दरम्यान, या हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी निवडणुक आयोगाकडे जाणार असल्याचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.
ओवैसींना आता Z+ सुरक्षा!
झेड प्लस सुरक्षा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची कडेकोट सुरक्षा असते. या अंतर्गत 36 सुरक्षारक्षक एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेत तैनात असतात. या 36 पैकी 10 नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स आमि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे कमांडे असतात. यासह काही पोलीस अधिकारीही झेड प्लस सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यात असतात. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे जवानदेखील यात समाविष्ट असतात. सुरक्षा कवचाच्या पहिल्या कक्षेची जबाबदारी NSG कडे असते. दुसऱ्या कक्षेत SPG कमांडो असतात. तर झेड प्लस सुरक्षेत एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनदेखील दिले जाते.
इतर बातम्या-