मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!, अमोल मिटकरी यांच्या ट्विटने कुणाची झोप उडाली?
अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाची कमिटमेंट घेऊनच सत्तेत सहभागी झाल्याचं सांगितलं जात आहे. 2024मध्ये निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाणार आहे. त्यांच्या नेतृत्वातच युती राज्यातील निवडणुका लढणार आहे.
अकोला | 22 जुलै 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कालपासूनच अजित पवार यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज राज्यात लागले आहेत. त्यावर अजित पवार यांना शुभेच्छा देतानाच त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणूनही पोस्टर लागले आहेत. अजितदादांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगूनही हे बॅनर्स, पोस्टर्स लागले आहेत. त्यामुळे या बॅनर्सची चर्चा होत असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून सर्वांचं लक्ष उडवून घेतलं आहे. मिटकरी यांच्या या ट्विटमुळे अनेकांची झोप उडाली आहे.
अजित पवार यांचा वाढदिवस असल्याने अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख अजित पर्व असा केला आहे. मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते शिंदे गटाचे सर्वच नेते आगामी निवडणुका शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं सांगत आहेत. एकनाथ शिंदे हेच 2024नंतरही मुख्यमंत्री असतील असं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. असं असताना अमोल मिटकरी यांनी ट्विट करून नव्या वादाला फोडणी दिली आहे. मिटकरी यांनी हे ट्विट करून शिंदे गटाची झोप उडवल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी राजकीय वर्तुळात फक्त मिटकरी यांच्या ट्विटची चर्चा आहे.
काय आहे व्हिडीओत?
मिटकरी यांनी या ट्विटसोबत एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यात अजित पवार यांची भाषणे दाखवण्यात आली आहेत. अजित पवार यांचे सभा, संमेलानातील व्हिडीओ दाखवण्यात आले आहे. तसेच अजितदादा यांना संघर्ष योद्धा संबोधत त्यांना निडर नेतृत्व आणि करारी व्यक्तीमत्त्वही म्हटलं आहे. अवघ्या 31 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा
दरम्यान, अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाची कमिटमेंट घेऊनच सत्तेत सहभागी झाल्याचं सांगितलं जात आहे. 2024मध्ये निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाणार आहे. त्यांच्या नेतृत्वातच युती राज्यातील निवडणुका लढणार आहे. महाविकास आघाडीला शह देण्यासाठी अजित पवार यांचा चेहरा पुढे केला जाणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन मिळाल्यामुळेच राष्ट्रवादीच्या आमदारांकडून वारंवार त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला जात असल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.