मी निर्व्यसनी, नीटनेटकेपणाची आवड, काकांना घाबरायचो, राजकारण कुणीही शिकवलं नाही; अजितदादा यांची हटके मुलाखत
घरात सर्व शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य होते. फक्त शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी यशवंतरावांना गुरु मानलं होतं. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेले होते, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
मुंबई | 23 जुलै 2023 : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सावलीतून बाहेर पडून त्यांनी पहिल्यांदाच आपल्या स्वतंत्र राजकारणाला सुरुवात केली आहे. अजित पवार हे पहिल्यापासून शरद पवार यांच्यासोबतच होते. शरद पवार हे काका असल्याने ते जिथे जातील तिथे अजित पवार असायचे. मग काँग्रेस असो की राष्ट्रवादी… काका जातील तिथे पुतण्या हे समीकरण ठरलेलंच होतं. अजितदादांवर शरद पवार यांच्या राजकारणाचा प्रचंड पगडा आहे. शरद पवार यांनीच अजितदादांना राजकारण शिकवल्याचंही बोललं जातं. पण अजित पवार यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. शरद पवार यांनी आपल्याला राजकारण शिकवलं नसल्याचा गौप्यस्फोटच अजित पवार यांनी केला आहे.
आम्हाला शरद पवार यांनी राजकारण शिकवलं नाही. आम्ही कुणाकडूनही राजकारणाच्या गोष्टी शिकलो नाही. भाषण कसं करायचं हेही कुणी सांगितलं नाही. पण आम्ही शरद पवार यांना पाहूनच राजकारण शिकलो. आम्ही प्रत्येक नेत्याला पाहत गेलो. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर वेगवेगळे राजकारणी कसं बोलतात, सभा कशी जिंकतात, भाषणात ते काय मुद्दे मांडतात हे आम्ही पाहत होतो. त्यातूनच मी शिकत गेलो. काही गोष्टी तुमच्यात उपजतही असाव्या लागतात, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तसेच दिल्लीतील राजकारणात रस नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी घेतलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
काकांना घाबरून असायचो
शरद पवार यांच्याशी लहानपणी कसे संबंध होते यावरही त्यांनी प्रकाश टाकला. आम्ही आमच्या सर्व काकांना घाबरून असायचो. लहानपणी कोणत्याच काकांच्या जवळ गेलो नाही. सर्वांची आदरयुक्त भीती असायची. पण घरातील मुलींचं काकांशी चांगलं जमायचं. आम्ही काकांपासून जेवढं दूर राहायचं तेवढा प्रयत्न केला, असं अजित पवार म्हणाले.
दादा रमले आठवणीत
यावेळी अजित पवार बालपणात रमले. चुलत सख्खं असं नातं आम्हा भावंडांमध्ये कधी जाणवलं नाही. आम्ही सर्व एकत्रच वाढलो. लहानपणी आम्ही धिंगामस्ती करायचो. पोहायला जायचो, म्हशीवर बसायचो. गोठ्यात खेळायचो, असंही त्यांनी सांगितलं.
पहिल्या गाडीचा नंबर सांगितला
शाळेत असताना आधी सायकलवर जायचो. नंतर राजदूत मोटारसायकल वापरली. तिचा नंबर होता 1965. श्रीनिवासला 9009 नंबरची एसडी घेतली. सुरुवातीच्या काळात गाड्या घेतल्याने त्यांचे नंबर पाठ आहेत. नंतर एमएचजे 6868 क्रमांकाची फियाट घेतली. नंतर एमटीपी 9999 या क्रमांकाची गाडी घेतली. नंतर गाड्या खूप गाड्या आल्या. त्याकाळात गाड्या घेणं म्हणजे खूप अप्रूप होतं. आता गाड्यांचं कौतुक राहिलं नाही.
एनडीमामांचं घर हक्काचं
आम्ही लहान असताना पवार कुटुंबाचं मुंबईत घर नव्हतं. आम्हाला म्हातारीचा बूट, चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया किंवा मत्सालय बघायचं असेल तर आमचं एकमेव हक्काचं घर म्हणजे एनडी पाटील यांचं घर. एनडी मामाचं घर छोटं होतं. पण आम्ही मिळून मिसळून राहयचो. आम्ही साधंपणाने राहणं पाहिलं आहे. शेतकरी कुटुंबात कसं राहायचं आणि कमी खर्चात घर कसं चालवायचं हे आम्ही अनुभवलं नाही. पण पाहिलं आहे, असंही ते म्हणाले.
मी निर्व्यसनी
मला कोणतंही व्यसन नाही. मी निर्व्यसनी आहे. कधी सिगारेट, तंबाखू, व्हिस्की वगैरे काही घेतलं नाही. अनेक लोक निर्व्यसनी असतात. पण त्यांनी कोणत्या ना कोणत्या व्यसनाचा अस्वाद घेतलेला असतो. मी तसलं काही कधीच केलं नाही. आमच्यावर घरात चांगले संस्कार झाले होते. आळशी राहायचं नाही. दुपारी झोपायचं नाही. सकाळी लवकर उठायचं. व्यसन करायचं नाही, हे आमच्यावर लहानपणापासूनच बिंबवलं गेलं. त्यामुळे मी आजही लवकरच उठत असतो, असं त्यांनी सांगितलं. आपल्याला लहानपणापासूनच स्वच्छ आणि नीटनेटकं राहायला आवडत अस्लयाचंही त्यांनी स्पष्ट केलं.