‘ते’ पद मागितलं, पण मिळालं नाही, वरिष्ठांना वाटलं…; अजितदादांनी बोलून दाखवली मनातील सल
सगळयांना कळतंय. लोक पाहत आहेत. इतर पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेले सांगतात आम्हाला शांत झोप लागते. भाजपने खुशाल लढावं आम्ही आमच काम करू.
पुणे: राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली आहे. मी जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच मला गृहमंत्री करा असं म्हटलं होतं. मागे अनिलरावांना (देशमुख) गृहमंत्रीपद दिलं. त्यांच्यानंतर मला गृहमंत्रीपद द्या म्हटलं तर नाही म्हटलं. वरिष्ठांनी हे पद दिलीप वळसे पाटलांना (dilip walse patil) दिलं. वरिष्ठांनाही वाटतं याला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही, असं अजित पवार म्हणाले. अजितदादांनी हे विधान करताच एकच खसखस पिकली.
राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार बोलत होते. यावेळी एका पदाधिकाऱ्याने भविष्यात आपलं सरकार आलं तर तुम्ही गृहमंत्री व्हा असं म्हटलं. त्यावर अजित पवारांनी हा किस्साच ऐकवला आणि आपल्याला कसं गृहमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आलं हे स्पष्ट केलं. दरम्यान, अजित पवारांच्या या विधानाच्या ब्रेकिंग बातम्या झाल्यानंतर त्यांना या बाबत विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. मी ते विधान गंमतीने केलं होतं. कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शिवाय लोक रेंगाळले होते. त्यांच्यात उत्साह भरण्यासाठी मला गृहमंत्रीपद हवं होतं असं गंमतीने म्हणालो, असं अजित पवार म्हणाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीला आल्या होत्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणी कुठेही जावं. सर्वांना अधिकार आहे. पण माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. बारामतीला कोणीही गेलं की ब्रेकिंग न्यूज होते, असं ते म्हणाले.
टारगेट महापालिका नाही. जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून काम केलं. लोकांनी कार्यकर्त्यांनी मदत केली मी काम केलं. महापालिकेबाबत विचार करत बसू नका. तीन चारचा प्रभाग झाला तरी लढायचं आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. एकत्रित लढण्यावेळी जे होईल ते होईल. तो निर्णय उच्चस्तरावर नेते घेतील. पण आपण खाली काम करा. त्या त्या वेळी काय होतं ते पाहू, असं त्यांनी सांगितलं.
सगळयांना कळतंय. लोक पाहत आहेत. इतर पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेले सांगतात आम्हाला शांत झोप लागते. भाजपने खुशाल लढावं आम्ही आमच काम करू. दाखवू त्यांनी त्याचं काम दाखवावं, असंही ते म्हणाले.
काल इस्लामिक संघटनेच्या 10-15 ठिकाणी रेड पडल्या. वरिष्ठ पातळीवरून ऑर्डर आल्या आहेत. त्यांना काही धागादोरा मिळाला असेल त्यामुळे कारवाई केली असेल, असं त्यांनी धाडीवर बोलताना स्पष्ट केलं.