Ajit Pawar: अरे भाऊ आमदार शिवसेनेचेच आहेत ना, सरकार अल्पमतात आहे म्हणणाऱ्या पत्रकाराला अजित पवारांनी लॉजिक सांगितलं
Ajit Pawar: अजितला बाहेरच्या राज्यातील लोकांची ओळख नाही. ती मला आहे. त्यामुळे या बंडामागे कोण आहे हे सांगायला नको, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काल म्हणाले होते. त्यावर, शरद पवार आमचे नेते आहेत.
मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. ज्या आमदारांनी बंड केलं ते आमदार शिवसेनेचे आहेत. मात्र, आमचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पाठिंबा आहे. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar), जयंत पाटील यांनीही हेच सांगितलं. मीही सांगितलं आहे. आता काय लिहून देऊ, असं अजित पवार म्हणाले. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीचं कौतुक कलं. मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी चांगली कामं केली आहेत. कोविडच्या काळात त्यांनी परिस्थिती चांगली हाताळली. सर्व्हेमध्ये त्यांचं नाव पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आलं, असं अजित पवार म्हणाले. अडीच वर्षातील ज्या समस्या आल्या. त्या हाताळण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं, असंही ते म्हणाले.
अजित पवार यांनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना सांभाळताना आपले आमदार मुख्यमंत्र्यांनी गमावले असं वाटतं का? असा सवाल अजित पवार यांना करण्यात आला आहे. त्यावर अजिबात नाही, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री वर्षावरून आधीही काम करत होते
मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडल्याने राज्याचं कामकाज थांबलं आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर दीड वर्ष मुख्यमंत्री मातोश्रीवरून काम करत होते. आताही काम करत आहे. तुम्हीच बातमी केलीय ना त्यांची, असं त्यांनी सांगितलं.
मविआ टिकवायची आहे
अजितला बाहेरच्या राज्यातील लोकांची ओळख नाही. ती मला आहे. त्यामुळे या बंडामागे कोण आहे हे सांगायला नको, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काल म्हणाले होते. त्यावर, शरद पवार आमचे नेते आहेत. ते आमचे दैवत आहेत. त्यांनी एकदा प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही, असं ते म्हणाले. ठाकरे सरकारच्या पाठी राहून मविआ टिकवायची आहे. शरद पवारांनी सांगितलं. मी सांगितलं. जयंत पाटील यांनी सांगितलं. आमची उद्धव ठाकरेंना साथ आहे. कितीवेळा सांगू. लिहून देऊ का?, असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला.
त्यांना सल्ला देण्याचा काडीचा अधिकार नाही
दोन आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी जे काही सांगितलं ते तुम्ही ऐकलं आहे. ऐकिव बातम्यांवर मी बोलत नाही. मी बोलणार नाही. ज्यांना वाटतं त्यांनी यावं सांगावं. जे जनतेततून निवडून आले आहेत त्यांनी समोर येऊन सांगावं. आपले आमदार कुठे गेले? देवदर्शनाला गेले, आराम करायला गेले? फिरायला गेले? कशाला गेले? हे जनता विचारेल, असं ते म्हणाले. ते माझे आमदार नाहीत. त्यांना सल्ला देण्याचा आम्हाला काडीचा अधिकार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.