चार दिवस सुनेचेही असतात लक्षात ठेवा; आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होताच अजितदादांचा गंभीर इशारा
आमदार कोणत्या पक्षाचा आहे हा विचार न करता चूक झाली असेल, कायदा हातात घेतला असेल, नियमाप्रमाणे वागले नसेल तर कारवाई करा. दुमत नाही, असं ते म्हणाले.
पुणे: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड सर्व धर्मीयांना सोबत घेऊन जाणारे आहेत. ते फुले, आंबेडकर, शाहू आणि शिवरायांचा विचार पुढे घेऊनच जात आहेत. राजकारणात राजकीय वैचारिक मतभेद असू शकतात. मतमतांतरे असू शकतात. पण अशा प्रकारे घटना घडू लागल्या तर त्या महाराष्ट्राला परवरडणाऱ्या नाही. यातून कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ शकते, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाडांवरील आरोपांवरून संताप व्यक्त केला आहे. आव्हाडांच्याविरोधात ते कलम लावण्याची गरज नव्हती. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालण्याची गरज आहे. चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचेही असतात हे लक्षात घ्या, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.
मी तो व्हिडीओ पाहिला. त्यात एक पोलीस ऑफिसरही होता. आव्हाड सर्वांना बाजूला व्हा, बाजूला व्हा करून पुढे जाताना दिसतात. एका भगिनीला मात्र त्यांनी थोडसं बाजूला व्हा करून पुढे गेले. यापेक्षा अधिक काही झालं नाही. असं असतानाही ज्या प्रकारे गुन्हा दाखल केला जातो, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांपासून दहा फूट अंतरावर हा प्रकार घडला. कारण नसताना गुन्हा दाखल झाला. खरंतर मुख्यमंत्र्यांनी हा गुन्हा होत नाही हे सांगितलं पाहिजे. कशाही प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री झाला असला तरी तुम्ही साडे तेरा कोटी जनतेचा प्रतिनिधीत्व करता, त्यामुळे तुम्ही सांगितलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
सत्ता येत असते, सत्ता जात असते. ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेला नाहीये. आम्हीही राज्यकर्ते म्हणून सरकारमध्ये काम केलं आहे. आमचाही कार्यकर्ता चुकला आणि आमच्या नजरेत आलं तर तू चुकला हे दुरुस्त केलं पाहिजे असं आम्ही त्याला सांगतो. स्टेजवर कोणी चुकीचं वक्तव्य केलं तरी स्टेजवर असलेल्यांना सांगतो हे उचित नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असं ते म्हणाले.
अशा प्रकारचं काम मारक आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायला हवी आहे. मी आव्हाडांना भेटणार आहे. त्यांना समजून सांगणार आहे. मी सरकारला सांगणार आहे.
आमदार कोणत्या पक्षाचा आहे हा विचार न करता चूक झाली असेल, कायदा हातात घेतला असेल, नियमाप्रमाणे वागले नसेल तर कारवाई करा. दुमत नाही, असं ते म्हणाले.
पण कारण नसताना लोकप्रतिनिधीला अपमानित करण्याचं काम करत असेल तर जनतेनेही जागृतपणे पाहिलं पाहिजे. सरकारनेही चुकलं हे सांगितलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला तो मागे घेतला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.