Amit Shah: अमित शाह, नड्डा मुंबईत येणार, गणेश दर्शन की ऑपरेशन महापालिका?; चर्चा तर होणारच
Amit Shah : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही मुंबईत येत आहेत. जेपी नड्डा हे 15 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. ते 15 आणि 16 सप्टेंबर हे दोन दिवस मुंबईत राहणार आहेत. यावेळी ते भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. नड्डा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नवी दिल्ली: भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढच्या आठवड्यात मुंबईत येणार आहेत. ऐन महापालिकेच्या तोंडावर अमित शाह (Amit Shah) मुंबईत येत आहेत. शिवाय शिवसेनेत उभी आडवी फूट पडल्यानंतरचा शाह यांचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. त्यामुळेही या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाह या दौऱ्यात गणपतीचं दर्शन करणार आहेत. मात्र, शाह गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत की महापालिका (bmc election) मोहीम फत्ते करण्यासाठी कानमंत्र देण्यासाठी येत आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या भेटीत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. शाहा यांच्या नंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही (jp nadda) सप्टेंबरमध्येच मुंबईत येणार असल्याने या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यावरून राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अमित शाह हे येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन शाह हे गणपतीचं दर्शन घेणार आहेत. शाह हे दरवर्षी मुंबईत गणेशोत्सवासाठी येत असतात. दरवर्षी ते न चुकता लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेत असतात. शाह हे 2017 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी मुंबईत येत असतात. मात्र, कोविडमुळे ते दोन वर्ष मुंबईत येऊ शकले नव्हते. मुंबईसह राज्यात गणेशोत्सवही साजरा झाला नव्हता. मात्रा, आता कोविडचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. लोकांना सण उत्सव साजरा करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मुंबईत गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शाह हे सुद्धा मुंबईत येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत.
मुंबई महापालिकेवर अधिक फोकस?
राज्यात मुंबई, ठाणे आणि पुण्यासह 14 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शाह मुंबईत येणार आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या भेटीत ते महापालिका निवडणुकीबाबत काही चर्चा करतात का? किंवा पालिकेच्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी लेव्हलला काही सूचना देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शाह काय रणनीती ठरवतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जेपी नड्डाही मुंबईत
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही मुंबईत येत आहेत. जेपी नड्डा हे 15 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. ते 15 आणि 16 सप्टेंबर हे दोन दिवस मुंबईत राहणार आहेत. यावेळी ते भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. नड्डा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. नड्डा आपल्या मुंबई दौऱ्यात राज्यातील भाजप नेत्यांशी महापालिका निवडणुकांवर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. खास करून मुंबई महापालिका जिंकण्यावर या भेटीत अधिक चर्चा होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.