‘राष्ट्रवादीचा गुण नाही पण वाण लागला’, खडसेंच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक
"खडसे यांनी वक्तव्य मागे घेतले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला पदवीधर निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील", असा इशारा आनंद दवे यांनी दिला (Anand Dave slams Eknath Khadse).
पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा गुण नाही पण वाण लागला. पदवीधर निवडणुकीत याची भरपाई करावी लागेल. एका ब्राह्मणाला मी मुख्यमंत्रीपदाचं दान दिलं, असं जाहीर वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. ब्राह्मण महासंघ याचा तीव्र निषेध करतो”, असं ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे म्हणाले आहेत (Anand Dave slams Eknath Khadse).
“दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी. याचे ज्ञान खडसे यांना नसावे याचे आश्चर्य वाटतं. खडसे यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना याचा जाब विचारण्यात येईल”, असा इशारा आनंद दवे यांनी दिला (Anand Dave slams Eknath Khadse).
“खडसेंनी विधान मागे घेऊन माफी मागावी, या मागणीचे आणि निषेधाचे पत्र घेऊन आम्ही उद्या ( सोमवार, 12 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या कार्यालयात जाणार आहोत. खडसे यांचा निषेध करुन आमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सुचना आम्ही तुपे यांना करणार आहोत. उद्या महाराष्ट्रभर सर्वच शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आम्ही अशी पत्रे देणार आहोत”, असं आनंद दवे यांनी सांगितलं.
“खडसे यांनी वक्तव्य मागे घेतले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला पदवीधर निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, याची जाणीव त्यांनी ठेवावी”, असादेखील इशारा दवे यांनी दिला.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले होते?
एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. “मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं”, असं खडसे म्हणाले होते.
गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले, असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली होती. ‘मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छेळलं.’ असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला होता.
संबंधित बातमी : फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपातील एका व्यक्तीने छळलं : एकनाथ खडसे