शिवसेना खासदार अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?
शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अनिल देसाई (Anil Desai meet Balasaheb Thorat) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अनिल देसाई (Anil Desai meet Balasaheb Thorat) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. अनिल देसाई यांनी थोरात यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली (Anil Desai meet Balasaheb Thorat).
निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या नेत्यांना सहभागी करुन घेतलं जात नाही, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज आहेत. काँग्रेस नेते आपली बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडणार आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली होती. मात्र, काही कारणास्तव त्यांची भेट पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, त्याच पार्श्वभूमीवर अनिल देसाई यांनी आज (17 जून) बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण बाजू ऐकूण घेतली.
हेही वाचा : थोरात-चव्हाण-राऊत यांच्यानंतर विजय वडेट्टीवारांकडूनही नाराजी व्यक्त
महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतलं जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची विभक्त बैठकही झाली होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते आपली बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडतील, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती.
बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. राऊत यांच्यापाठोपाठ आज (17 जून) मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेसचा वाढता नाराजीचा सूर लक्षात घेऊन अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतली.