अनिल परबांकडून सोमय्यांविरुद्ध 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, मुश्रीफही पवारांच्या भेटीला
सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. परब यांनी मंगळवारी सोमय्यांविरोधात 100 कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्यांना एक नोटीस पावली आहे. त्यानुसार आता सोमय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिलं आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसंच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. (Anil Parab’s Rs 100 crore defamation suit against Kirit Somaiya)
सोमय्या यांनी परब यांच्यावर आरोप करतानाच काही पुरावेही सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाला दिले होते. दरम्यान परब यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावत आज अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या सांगलीतील संपत्तीची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हसन मुश्रीफ पवारांच्या भेटीला
दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी यांनी ग्रामविकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांवर 127 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर आज मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. सोमय्यांचे आरोप आणि सत्य परिस्थिती यासंदर्भातली माहिती पवारांनी मुश्रीफांकडून घेतल्याचं कळतंय. दरम्यान, मुश्रीफ यांनीही सोमय्या यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा दावा दाखल करणार असल्याचं कालच सांगितलं आहे.
आरोप सिद्ध करण्याचे सोमय्यांसमोर आव्हान
हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबतचे 2700 पानांचे पुरावे सोमय्या यांनी आज मुंबईत आयकर विभागाला दिले आहेत. ठाकरे सरकारच्या डर्टी 11ची नावे मी जाहीर केली होती. यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे, असं सोमय्या यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं. दरम्यान, मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांनीही यापूर्वी सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यासमोर आता केलेले आरोप सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे.
किरीट सोमय्या यांना शिवडी कोर्टाचे समन्स
किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी अर्थ या एनजीओवरदेखील गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. याच आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या 5 ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
सोमय्या यांना 22 सप्टेंबर, 5 ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी लावावी लागणार
या आरोपांना आव्हान देत प्रवीण कलमे आणि अर्थ या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करून घेण्यात आली असून त्यावर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे सोमय्या यांना येणाऱ्या 22 सप्टेंबर आणि 5 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. एवढेच नाही तर केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी सोमय्या यांना खटाटोप करावा लागणार आहे.
इतर बातम्या :
किरीट सोमय्या यांना शिवडी कोर्टाचे समन्स, ‘अर्थ’ संस्थेवर केलेल्या आरोपांवर द्यावं लागणार स्पष्टीकरण
Anil Parab’s Rs 100 crore defamation suit against Kirit Somaiya